@maharashtracity

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire brigade) वाहन ताफ्यात लवकरच ३० मिटर उंच नवीन शिडी दाखल होणार आहे. या शिडीच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. (30 meter high ladder will be inducted in Mumbai fire brigade)

ही नवीन शिडी ऑस्ट्रिया (Austria) येथून आयात करण्यात येणार आहे. या शिडीची बांधणी व पुरवठा आणि वाहतूक खर्च पाहता पालिकेला या शिडीसाठी ९ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

मुंबईत ६० मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या इमारती (High rise buildings) आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास उंच ठिकाणी जाऊन आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान उंच शिडीच्यामार्फत करतात. मुंबईत सध्या अग्निशमन दलाच्या ६ प्रमुख अग्निशमन केंद्रांच्या अधिपत्याखाली ३५ अग्निशमन केंद्रे व १७ छोटी अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत.

उंच इमारतींमधील आग विझविणे, इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे आदी कामांसाठी उंच शिडींचा वापर करण्यात येतो.

सध्या अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यात विविध प्रकारची २५८ वाहने आहेत. त्यामध्ये २५ मिटर व ९० मिटर उंचीच्या शिड्यांचा समावेश आहे.

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच उंच इमारतींच्या संख्येतही भर पडत आहे. वर्षभरात मुंबईत किमान १ हजार ते २ हजार ठिकाणी बांधकामे सुरू असतात. तर अनेक ठिकाणी उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत.

अशा उंच इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास आग विझविण्यासाठी आणि बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दल त्यांच्या ताफ्यातील किमान २५ मिटर उंच व ९० मिटर उंच शिडीचा वापर करते. मात्र उंच इमारतींची वाढती संख्या व दुर्घटना पाहता अग्निशमन दलाच्या ताफ्यात जास्तीत जास्त उंच शिड्या असणे आवश्यक ठरते.

त्या दृष्टीने अग्निशमन दलाने २००३ मध्ये खरेदी केलेली ३० मिटर उंचीची शिडी १७ वर्षे वापर केल्यानंतर व ती कालबाह्य ठरल्याने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात ३० मिटरची नवीन शिडी खरेदी करून अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहे.

ही नवीन शिडी ऑस्ट्रिया येथून मे. रोजेनबॉअर इंटरनॅशनल एजी या वितरक कंपनीमार्फत समुद्रमार्गे जहाजाद्वारे आयात करण्यात येणार आहे. खरे तर पालिकेने या शिडीसाठी ११ कोटी १५ लाख रुपये खर्चाचा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्षात अग्निशमन दलाला ही शिडी २ कोटी रुपये कमी किमतीत म्हणजे ९ कोटी १९ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर आणि वर्कऑर्डर दिल्यानंतर पुरवठादार ही शिडी परदेशामधून आयात करणार आहे.

या नवीन उंच शिडीसाठी २ वर्षांचा हमी कालावधी असणार आहे. तसेच,आवश्यकता भासल्यास १० वर्षे या उंच शिडीच्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलात ही उंच शिडी दाखल झाल्यावर पुरवठादार अग्निशमन दलातील संबंधित जवानांना ह्या शिडीच्या हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था भायखळा येथील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here