@maharashtracity
मुंबई: सईद काश्मिरीच्या हत्त्येनंतर तत्कालीन मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कसोटीच लागली. तपासाचे आणि माहितीचे स्रोत सर्वच दिशांनी तपासले तर ते अयुब लालापर्यंत (Ayub Lala) पोहोचत होते. मात्र निश्चित पुरावा उपलब्ध होत नव्हता. सरदारजींनं हत्या केली. पण तो आला कुठून, हत्या करून गेला कुठे, त्याला कुणी सुपारी दिली की त्यानंच हत्या केली, या हत्येचा बदला अयुब लाला घेईल की हातावर हात ठेवून गप्प राहिल….अनेक प्रश्न समोर येत होते. पण पोलीस दलाला त्याची उत्तरे मिळत नव्हती.
तसं अयुब लाला हा तपास यंत्रणा, दक्षता यंत्रणा आणि सर्वच शासकीय यंत्रणांशी मधुर संबंध ठेवून होता. बसल्या जागेवरून हवी ती सरकारी कामं करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या चपलांनी कधी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले नव्हते.
महिना-दोन महिने अयुब लाला याला संशयित नजरेंनं उलट सुलट तपासणी करूनही अयुबचा हात असण्याचे पूरावे न मिळाल्याने अखेर पोलीस दलांनं अयुब लालाचं स्टेटमेंट नोंदवून या प्रकरणावर पडदा टाकायचं ठरवलं. डोंगरी पोलीस ठाण्यात ही केस नोंदवली होती. तेथील नवख्या पोलीस निरीक्षकानं अयुब लालाला पोलीस ठाण्यात आणण्याचा हट्ट धरला. हवालदार – शिपायांनी समजावूनही त्यांनं आपला हट्ट सोडला नाही. अखेर एका पोलिसानं सरकारी निरोप त्याला सांगितला आणि तो डोंगरी पोलीस ठाण्यात हजर झाला.
अयुब लाला पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याच वेळी अयुब लाला याला अटक झाल्याची बातमी वा-यासारखी मुंबईभर पसरत गेली आणि डोंगरी पोलीस ठाण्यासमोर असणा-या मोकळ्या जागेत बातमी कानावर पडलेल्या मुंबईभरातील
पठाणांचा (Pathan} जमाव जमण्यास सुरूवात झाली.
दुपारी दोनच्या सुमारास अयुब लाला पोलीस ठाण्यात आला. त्याचं फक्त स्टेटमेंट घ्यायचं होतं. ते घेतलं की पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार केसचा तपास थांबवला जाणार होता. एकदा फाईल बंद म्हणून शिक्कामोर्तब झालं की काही ठोस क्ल्यू मिळाला तर फाईल पुन्हा उघडली जाणार होती. पण पठाणांचा असा समज झाला की अयुब लाला याला अटक झाली असावी. त्यामुळे त्याच्या समर्थनार्थ पठाणांनी गर्दी केली. स्टेटमेंट घेण्याचा वेळ वाढत चालला तसतसा पठाणांचा धीर सुटत चालला होता.
जवळजवळ दोन-तीन तासांनंतर स्टेटमेंट पूर्ण झालं आणि अयुब लालाची सुटका झाली. स्टेशनमधून खाली उतरल्यावर सामो-या आलेल्या समर्थकांशी चकार शब्दही न बोलता अयुब लाला घराच्या दिशेने चालू लागला. समर्थकांनी त्याचा पिच्छा पुरवला. तो घरात शिरतो ना शिरतो तोच ही मंडळी मागोमाग आत शिरली. त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला….’क्या हुवा था…?’
काहीही उत्तर न देता अयुब लालानं आपल्या घरातल्या माणसांची मदत घेत घर, घरातील वस्तूंची आवराआवर करायला सुरुवात केली. समर्थक विचारू लागले….’दादा, क्या चल रहा हैं.. ये बांधाबांध कैसी…?’ (त्या काळात भाई असे संबोधन नव्हते. दादा म्हटले जात असे.)
‘मुंबई छोड के चला जा रहा हूं…’ अयुब लालानं उत्तर दिलं. ‘क्यों’,’ ‘क्या हुवा…?”, ‘हमपर नाराज है क्या..?”. आदी प्रश्न समर्थकांकडून विचारले गेले. अयुब लालानं आपला मुंबई सोडण्याचा हट्ट चालूच ठेवला. अयुब लालानं लालानं स्पष्ट शब्दात सांगितलं. “जिसे पोलीस स्टेशन की पायरी एक बार भी चढनी पडी, तो उसे अपने आपको दादा कहलाने का हक नही…मै बम्बई छोड के जा रहा हूं…”
“तो हमारा क्या? हम कैसे रहेंगे आप के सीवा््…?” यासारख्या अनेक प्रश्नांना त्यानं एकच उत्तर दिलं..” .कोई भी आपमेसे नेतागिरी करेगा…..” उत्तरादाखल सर्वांनी म्हटलं, ” दादा, आप ही तय करो….” अयुब लाला टाळत होता पण अखेर त्यानं म्हटलं….”यह रहेगा आप का नेता…!” असं म्हणताना त्यानं एका पंचवीशीच्या पोराकडे बोट दाखवलं. सहा फूट उंच, भेदक डोळे, केस उलटे फिरवलेले हे पोराचं वर्णन होतं.
मुंबईतील पठाणांच्या व्यवहारावर पाळत ठेवणारी पठाण ब्रॅंच. पठाण ब्रॅंच थेट संपर्क ठेवायची ती जिर्गा ए पख्तुन या संस्थेचा हा तरुण प्रमुख पदाधिकारी ठरला. एवढेच नव्हे तर मुंबईतील चौदा हजार पठाणांचा नेताही ठरला.
या तरुण पोरानं पुढे मुंबई गाजवली. त्याचं नाव शेख अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला. त्यानं पुढे अख्खं अंडरवर्ल्ड गाजवलं. एका रात्रीत तो १४००० पठाणांचा म्होरक्या झाला आणि त्याला नेता बनवणारा अयुब लाला मुंबई सोडून निघून गेला. असं म्हणतात की त्यानं शाळा काढली. गुन्हेगारी क्षेत्र सोडलं.
(करीम लालाचं साम्राज्य..पुढील अंकी)
(विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी क्षेत्राचे वार्तांकन केले आहे.
खूप छान माहिती.