मुंबई

राज्यात पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे, आजपासून टँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रक चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी ट्रक चालकांना १० वर्षांची शिक्षा आणि ७.५ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. या तरतुदीला देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला आहे.

सोमवारी या प्रकरणी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले. राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात.

या आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑईल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे. काही ट्रक चालकांनी मुंबईत रस्त्यावर टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी घोषणाबाजी करीत कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून अनेक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर दुपारनंतर हळूहळू वाहतूक व्यवस्था पूर्ववत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here