By Santosh Masole

X : @SantoshMasole

धुळे

जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सात कामचुकार अमलदारांना सेवेतून निलंबित करण्याची बक्षिसी दिली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

पोलिस अधिक्षकांनी कामचुकारांना दिलेला दणका आज पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला. पोलिस दलाच्या सेवेतून निलंबीत करण्यात आलेल्या अंमलदारांमध्ये साक्री येथील प्रदीप भटूसिंग ठाकरे, राकेश प्रकाश बोरसे, मुक्ता ईच्छाराम वळवी, विनोद पंडीत गांगुर्डे व किशोर श्रीराम पारधी अशा पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय नियंत्रण कक्षातील महेंद्र दौलतसिंग ठाकूर व मोटारवाहन विभागाचे अमोल रमेश भामरे यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

श्रीकांत धिवरे (Dhule SP Srikant Dhiware) यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर विद्यमान पोलिस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि प्रशासकीय कामकाज पाहणार्‍या जवळपास सर्वांच्याच कार्यपध्दतीची त्यांच्या खास आणि  विशिष्ट पद्धतीने माहिती घेतली. यानंतर जिल्ह्याच्या दृष्टीने संवेदनशिल असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करुन नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. 

नाकाबंदी कालावधीतच जिल्हा पोलिस घटकांतील दंगा काबू पथकातले काही पोलिस अंमलदार अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असल्याचे उघड झाले. काही अंमलदारांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी बिनतारी संदेशाव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बेपर्वाई केली. वरिष्ठांची परवानगी न घेता ते कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा कामचुकार सात जणांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.

एवढेच नव्हे तर त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश पत्रात म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका तसेच इतर महत्वाच्या बंदोबस्तावेळी कोणी कामात दिरंगाई किंवा कामचुकारपणा करु नये या कारवाई मागचा उद्देश आहे. कामात कुचराई करणाऱ्यांवर निलंबनासाररखी कठोर कारवाई करुन धिवरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलात खळबळ उडवून दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here