@maharashtracity

९ लाख २२ हजार ५१५ मुलांची नोंद

मुंबई: बहू प्रतीक्षेत असलेल्या १५ ते १८ वर्षे वयोगटाला आज सोमवारपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. या लसीकरणासाठी ऑफलाइनही नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठीही पालिकेकडून भर दिला जात असून पहिल्या दिवशी चार हजार डोस दिले जाण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, १५ ते १८ वयोगटात ९ लाख २२ हजार ५१५ मुलांची नोंद असून ९ जंबो कोविड सेंटरवर (Jumbo covid Center) या मुलांचे लसीकरण (vaccination) करण्यात येणार आहे. १५ ते १८ वयोगटातील मुले शाळा किंवा महाविद्यालयातील असून लसीकरण कोविड सेंटरवर आणण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहणार आहे.

या मुलांना लसीकरणासाठी कोविन अँपवर (Cowin App) नोंदणी करता येणार आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ठरवलेल्या लसीकरण केंद्रावर कोवॅक्सीन लसचा (Covaxin) पुरेसा साठा ठेवण्यात यावा, असे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच मुंबईत महापालिकेच्या (BMC) शंभर शाळांतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

ऑनलाईन नोंदणी सह पालिकेच्या शाळांमधील एकत्र जमलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित लसीकरण केंद्रांत नेण्याची आणि परत शाळेत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली गेली आहे. प्रत्येक झोन नुसार सोय विभाग – लसीकरण केंद्र-

ए, बी, सी, डी, ई- भायखळा रिचर्ड्स ॲड क्रुडास, एफ उत्तर, एल, एम पुर्व, एम पश्‍चिम – सोमय्या जंम्बो कोविड केंद्र चुनाभट्टी, एफ दक्षिण, जी दक्षिण, जी उत्तर – वरळी एनएससीआय डोम जंम्बो कोविड केंद्र, एच पुर्व, के पुर्व, एच पश्‍चिम – बीकेसी जंम्बो कोविड केंद्र, के पश्‍चिम, पी दक्षिण – नेस्को जंम्बो कोविड केंद्र गोरेगाव, आर दक्षिण, पी उत्तर – मालाड जंम्बो कोविड केंद्र, आर मध्य, आर उत्तर – दहीसर जंम्बो कोविड केंद्र, एन, एस- क्राम्प्टन ॲन्ड ग्रीव्हस कोविड केंद्र कांजूरमार्ग, टी – रिचर्ड्स ॲन्ड क्रुडास कोविड केंद्र मुलूंड ही केंद्र आहेत.

लस टोचून घ्या असे आवाहन

२००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील. लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्‍य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरुन न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. त्याच प्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्यास नजीकच्‍या महानगरपालिका रुग्‍णालयात संपर्क साधावा.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच सर्व पालकांनी या वयोगटातील आपापल्या पात्र पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here