@maharashtracity

राज्यात ५४४ कोरोना रुग्ण

मुंबई: राज्यात बुधवारी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली असून सुमारे २३ महिन्यानंतर शून्य मृत्यू नोंद आहे. १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत पहिल्यांदाच शू्न्य मृत्युची नोंद झाली आहे. यावर बोलताना कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, लसीकरण तसेच संसर्गाची तीव्रता कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

डॉ. सुपे पुढे म्हणाले की, मंगळवारी राज्यात पाच मृत्यू नोंदविण्यात आले होते. त्यामुळे हे अपेक्षित होते. हा चांगला परिणाम मिळत असल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले. वाढते लसीकरण व जनजागृतीमुळे रुग्णसंख्या घटत आहे.

राज्यात बुधवारी ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८,६६,९२४ झाली आहे. तर बुधवारी १००७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१३,५७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज एकूण ५६४३ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात कोरोना मृत्यू नोंद न झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८०,०३,८४८ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ७८,६६,९२४ (१०.०९टक्के) नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४५,४२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बुधवारी राज्यात ३८ ओमीक्रोन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. यात पुणे मनपा ३७, औरंगाबाद १ असा रुग्णांचा तपशील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ४७७१ ओमीक्रोन रुग्ण आढळून आले असून यापैकी ४६२९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत एकूण १३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्या पैकी ८४८० नमुन्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९०२ नमुन्याचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत १०० बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १०० रुग्ण आढळले असून आता मुंबईत एकूण १०५५७३१ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू नोंद झाल्याने मुंबईत एकूण मृत्यूची संख्या १६६३१ एवढी झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या वर्षात जानेवारी महिन्यात १ वेळा, फेब्रुवारी महिन्यात ९ वेळा तर मार्च महिन्यात २ वेळा शून्य मृत्यू नोंद करन्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here