Twitter: @the_news_21

धुळे: पर्यटन संचालनालय व जैवविविधता संरक्षण समिती, बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी स्पर्धा-2023 आज बारीपाडा येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत 95 महिलांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय जनजाती आयोगाचे माजी अध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की, बारीपाडा येथे होत असलेल्या वनभाजी स्पर्धेमुळेच देशभरात वनभाजी स्पर्धा सुरू झाली आहे. हे एक चांगले काम असून भविष्यात नैसर्गिक जैवविविधता टिकून ठेवण्याचे उत्तम काम याठिकाणी चैत्राम पवार यांनी गेल्या काही वर्षापासून केले आहेत. हे काम संपूर्ण देशात नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, तसेच नैसर्गिक जैवविविधता टिकून ठेवल्यास भविष्यात येणाऱ्या पिढीला याचा मोठा फायदा होणार आहे.

आमदार मंजुळा गावीत म्हणाल्या की, चैत्राम पवार यांच्यामुळे बारीपाडा गाव हे जगाच्या पाठीवर पोहचले आहे. दरवर्षी येथे ऑगस्ट महिन्यात वनभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वनभाजी स्पर्धेमुळे येथील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बारीपाडा गावात अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात. संपुर्ण गाव हे एकजुटीने काम करते त्यामुळे हे गाव आदर्श गाव म्हणून देशात ओळखले जाते.

याठिकाणी जंगलाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे केले असून येथे अनेक विद्यार्थी, देशी पर्यटक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी अभ्यास करण्यासाठी याठिकाणी दरवर्षी भेट देत असतात. बारीपाडा गावात आदर्शशाळा, शेती सुधारणा, वनाचे संवर्धन, दारुबंदी, लोकसहभागातून जलसिंचनाचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात बोलतांना श्री. चैत्राम पवार म्हणाले की, 2004 पासून बारीपाड्यात वनऔषधी व वनभाज्यांची पाककला स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेची मूळ संकल्पना कॅनडा येथील विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. शैलेश शुक्ला संशोधनासाठी बारीपाडा येथे आले. त्यांच्या संकल्पनेतून पुढच्या पिढीस वनभाजांची माहिती मिळावी तसेच जल, जंगल गावकऱ्यांनी कसे सांभाळावे हा आदर्श ठेवत याची सुरुवात झाली.

सुरुवातीला 24 महिला स्पर्धकांपासून याची सुरुवात झाली असून स्पर्धेचे यंदा 19 वे वर्ष आहे. यावर्षी 224 महिलांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. तर 95 महिलांनी यास्पर्धेत सहभाग घेतला. उत्कृष्ट भाज्या बनवलेल्या पाच महिलांना पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारत माता व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी या स्पर्धेत जंगलातील औषधी व विविध भाज्या आळीब, फांद्या, ओवा, बाफळी, बांबू कोंब, कडव्या, हळूद, केलभाजी, कोहळा, चंदका, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचुच, मेका, मोका, नागगुल, राजगिरा, रानतुळस, सोनरु, सोलव्यानींबू, शिरिसफुल, तुराठा, उलशि, वनदोडका, वनस्पतीच्या मुळया पाने, फुले, खोड साल, बी, इत्यादी प्रकारच्या वनभाज्यांचा समावेश होता.

या स्पर्धेत परिसरातील 15 गावातील आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे विशेष म्हणजे एका महिलेने तब्बल 135 भाज्या तयार केल्या. तर एका स्पर्धकाने 117 भाज्या बनवल्या दुसऱ्या महिलेने 110 भाज्या स्पर्धेत सादर केल्या. वनभाज्यांच्या सादरीकरणाचे ताट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

वनभाजी स्पर्धा 2023 मध्ये पारितोषिक पात्र स्पर्धक महिलांची नावे प्रथम क्रमांक श्रीमती अंजली शांताराम भोई यांनी 135 वनभाजी ठेवल्या होत्या. त्यांना रोख पाच हजार रुपये व साडी तर द्वितीय क्रमांक श्रीमती भारती परशुराम अहिरे यांनी 117 वनभाजी ठेवल्या होत्या. त्यांना दुस-या क्रमांकाचे चार हजार रुपये व साडी तर तृतीय क्रमांकाचे श्रीमती तारा गजमल कांबळे यांनी 110 वनभाजी ठेवल्या होत्या. त्यांना रोख तीन हजार रुपये तसेच चौथा क्रमांक श्रीमती सुनिता दीपक पवार दोन हजार रुपये व साडी, पाचवा क्रमांक श्रीमती विमल पवार एक हजार रुपये व साडी देवून सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत 95 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी वनभाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून तसेच गुजरात राज्यातून अनेक पर्यटक आले होते. तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याठिकाणी विविध स्टॉल मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुषमा पवार यांनी तर आभार प्रदर्शन अनिल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बारीपाडा गावातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here