By Santosh Masole

Twitter: @SantoshMasole

धुळे: आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून वीस मे पर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा एम आय एम चे आमदार फारूक शहा (MIM MLA Farooq Shah) यांनी आज अधिकाऱ्यांना दिला.

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा व अनेक वेळा खंडित होणारी वीज या समस्यांवर प्रशासकीय अडचणी समजावून घेण्यासाठी आ. फारूक शहा यांनी आज गुलमोहर या शासकीय निवासस्थानाच्या दालनात वीज वितरण कंपनी व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक घेतली.

यावेळी महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता म्हस्के, कार्यकारी अभियंता पाटील, महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत ओगले, वीज विभागाचे कर्मचारी सी.सी.बागुल उपस्थित होते.

या बैठकीत वीज कंपनीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्यातच जुंपली. वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होणे यांमुळे पाणी ओढणारे पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड होताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचून लगोलग वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करते, अशी माहिती दिली.

यावेळी आ. फारूक शहा यांनी दोन्हीही विभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात ताकीद दिली. पाणी पुरवठा (water supply) आणि वीज पुरवठा (power supply) सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, जनभावनांचा आदर राखून प्रसंगी महापालिकेवर मोर्चा काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू, असा इशारा यावेळी आ. शहा यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here