Twitter: @SantoshMasole

धुळे: सातत्याने खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याविरोधात शिवसेनेने (उद्धव) आज भर उन्हात रास्ता रोको करून प्रभारी अधिक्षक अभियंता म्हस्के यांना घेराव घातला. खंडित विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना विद्युत वितरण कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन छेडेल व त्यातून उपस्थित होणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर सर्वस्वी अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, थोडे जरी वादळ, वारा आणि पाऊस सुरू झाला तरी तासनतास विज पुरवठा खंडीत होतो आहे. वाढत्या उष्मामुळे नागरीकांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असतांना खंडीत विज पुरवठ्यामुळे लहान बालके, वयोवृद्ध, व्यापारी प्रतिष्ठाणे, शासकीय कार्यालये एवढेच काय मनपाचा पाणी पुरवठा विभागही त्या मुळे हवालदिल झाले आहेत.

विजेअभावी जलकुंभ भरलेच जात नसून नागरीकांना आधीच आठ दिवसानंतर मिळणारे पाणी आता दहा बारा दिवसाआड मिळू लागले आहेत. इन्व्हर्टर पुरेशा विजेच्या अभावी चार्ज होत नसुन त्याचा काहीच फायदा होत नाही. विजेवर आधारीत छोटे मोठे व्यावसायिक, पाॅवरलूम धारक हैराण झालेले असून त्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. नेमची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे विद्युत कंपनीकडून विजतारांना अडसर ठरणारे झाडे तोडण्याची कामे, जिर्ण व लोंबकळत असणाऱ्या तारा, उघड्या असलेल्या डी.पी., एवढेच काय शहरात अनेक दाट वस्ती व काॅलनी परिसरासत अनेक विद्युत पोल वाकलेले असताना ते बदलण्याचे किंवा दुरुस्तीचे काम अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळेच विज बिलांचा नियमित भरणा करूनही नागरीकांना म्हणजे विद्युत वितरणच्या ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अटी शर्तीनुसार कंपनी सुविधा पुरविण्यात असर्मथ ठरत आहे.

वीज खंडित झाल्यावर कर्मचारी तब्बल तास दोन तासानंतर दुरुस्तीसाठी पोहचतात. त्यांच्याकडे अनेकदा पुरेशी दुरुस्तीची साधने देखील नसतात. त्यामुळे अनेकदा नागरीक व कर्मचारी यात वाद होतात. याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. शहरातील लोंबकळत असलेल्या व जिर्ण असलेल्या वीज वाहिन्या बदलण्याबाबत तसेच भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याबाबत शासनाकडून अनेकदा निधी मंजूर होऊनही ती कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वास्तवीक पाहता फेजअनुसार शहरातील 90% ग्राहकांकडून विज बिलांची वसुली असतांनाही विद्युत कंपनीकडून व अधिकारी वर्गाच्या अकार्यक्षमतेमुळे शहरातील पेठ भाग, मोगलाई, साक्रीरोड, महिंदळे, लालबाग, आझाद नगर, कृषी महाविद्यालय, देवपुर, स्टेशन रोड आदी भागांतील विद्युत वितरण कंपनीच्या (Mahavitaran) ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. वरील सर्व कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देखील नसल्यामुळेच नागरीक हवालदिल झाले आहेत.

वरील निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करून येत्या आठवडाभरात शहरातील दुरुस्तीचे कामे युध्दपातळीवर पुर्ण करून खंडित विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना विद्युत वितरण कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन छेडेल व त्यातून उपस्थित होणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावर (Law and Order situation) सर्वस्वी अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला.

आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे (Atul Sonawane) उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा.शरद पाटील (Prof Sharad Patil), महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ सुशील महाजन, हेमाताई हेमाडे, जयश्री वानखेडे आदी उपस्थित होते.

Previous articleमलेरिया रुग्णांत घट
Next articleधुळे : म्हणून मनसे कार्यकर्त्याने केली मनपा आयुक्त दालनासमोर अंघोळ
Santosh Masole
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here