जागतिक मलेरिया दिनाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
Twitter: @maharashtracity
मुंबई: ‘इटस टाईम टू डिलीव्हर झिरो मलेरिया’ अशी यंदाच्या २०२३ वर्षासाठी साठीचे जागतिक हिवताप दिनाची थिम असून त्यानुसार वर्षभर सर्व ग्रामीण व शहरी भागात हिवताप रुग्णसंख्या शून्य येईल यादृष्टीने कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरवले आहे. तसेच गेल्या चार वर्षात राज्यातील मलेरिया रुग्णांची सतत घट होत असली तरी चाचण्या वाढवल्या असल्याचे २५ एप्रिल रोजीच्या जागतिक मलेरिया दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२१ या वर्षाच्या तुलनेत राज्यात २०२२ या वर्षात हिवताप दूषित रुग्णांमध्ये २० टक्के घट झाली आहे. तसेच २०२१ मध्ये मलेरियासाठी एकूण १,३३,६७३७९ इतक्या रक्तनमुना तपासणी करण्यात आल्या. तर सन २०२२ मध्ये १,६४,७०९५१ रक्तनमुने तपासणी करण्यात आल्या असून २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तपासण्यात वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र तुलनेने हिवताप दूषित रुग्णांमध्ये घट असल्याचे स्पष्ट होते.
सन २०२२ मध्ये राज्यात एकूण ५ जिल्हे – लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये हिवताप दूषित शून्य रुग्ण आढळले. तर १ ते १० अशी रुग्णसंख्या असलेले एकूण १६ जिल्हे असून यात भंडारा, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशिम, सांगली, बीड, सोलापूर, औरंगाबाद ,जालना, यवतमाळ यांचा समावेश आहे.
हिवताप हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतुपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडियम व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती प्रामुख्याने आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडियम फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून त्यामुळे मेंदूचा हिवताप होवून रुग्ण दगावू शकतो. हिवतापाचा प्रसार दुषित ऑनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. हिवताप हा जास्तीत जास्त प्रमाण जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळत असून तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सांडपाण्याचे नियोजन आदी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.
रोग प्रसार कसा होतो :
हिवतापाचा प्रसार ऑनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या इ. मध्ये होते. डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात.
राज्यात निवडक जिल्ह्यातच अळीनाशक फवारणी :
नागरी हिवताप योजनेंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये (मुंबईसह) डासोत्पत्ती स्थानांवर टेमिफॉस, बी.टी.आय. या अळीनाशकांची फवारणी करण्यात येते. राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई.
वर्षनिहाय हिवताप परिस्थिती
सन रुग्णसंख्या एपीआय एबीइआर
२०२० १२९०९ ०.०७ १३.७३
२०२१ १९३०३ ०.१० ९.७३
२०२२ १५४५१ ०.१५ १०.४०
२०२३. १४८७ ३.२
(मार्च पर्यंत)