पाणी कपातीने रुग्णसेवेचे हाल

Twitter: @maharashtracity 

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जल बोगद्याचे काम सुरु झाल्याने मुंबईत पाणी कपात सुरु आहे. दरम्यान, या पाणी कपातीचा त्रास रुग्णसेवेला देखील होत आहे. रुग्णालयात विविध कामांसाठी पाण्याची मोठी मागणी असते. त्यासाठी रुग्णालये टँकरने पाण्याची मागणी करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात वागळे इस्टेट परिसरात बेकायदेशीरपणे बोअरवेल खोदण्याच्या कामात विकासकाकडून पालिकेच्या १०० मीटर जमिनीखाली असणाऱ्या जल बोगद्याला धक्का लागला. जल बोगद्याला धक्का बसल्याने मुंबईत १ एप्रिलपासून १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. आता तर ऐन उन्हाळ्यात १५ टक्के पाणी कपात म्हणजे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

दरम्यान केईएम, नायर, सायन, कूपर ही मुंबई महापालिकेची मोठी रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. मुंबईत १ एप्रिलपासून पाणी कपात लागू झाल्यापासून रुग्णालयातही पाण्याची टंचाई जाणवत आहे. मोठ्या रुग्णालयासह मुंबई महापालिकेच्या १६ सर्वसाधारण रुग्णालयात पाण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कूपर रुग्णालयात ४० लाख लिटर पाण्याची टाकी आहे. टाकीतील पाण्याची पातळी कमी झाली की प्रशासन विभाग कार्यालयात फोन करतात, ज्यामुळे पाण्याचे टँकर उपलब्ध होतात. सध्या रोज तीन ते चार पाण्याचे टँकर मागवण्यात येतात, अशी माहिती कूपर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 

तर सांताक्रूझ येथील व्ही एन देसाई रुग्णालयात ८० हजार लिटर पाण्याची टाकी असून रोजची पाण्याची गरज लक्षात घेता रोज तीन ते चार पाण्याचे टँकर मागवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तीच अवस्था जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरची आहे. या ठिकाणी रोज तीन ते चार पाण्याचे टँकर मागवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, रुग्णालयातील स्वच्छता राखणे, ऑपरेशन थिएटरमध्ये पाण्याची गरज भासते अशा विविध कामांसाठी रोज लाखो रुपये पाण्याची गरज भासते.  मात्र पाणी कपात झाली की त्याचा फटका रुग्णालयांना बसतो, असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता त्यावर प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here