कर्करुग्ण उपचारावाचून वंचित

Twitter: @maharashtracity

मुंबई: कर्करुग्णांच्या उपचारासाठी वरदान ठरणारे सेवन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) बंद पडलेले लिनिअर ऍक्सीलेटर मशीन नादुरुस्त असल्याची बाब समोर येत आहे. हे मशीन पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असणारा १२ कोटी रुपयांचा निधी देण्यास चालढकल होत असल्याची बाब गंभीर असून त्यामुळे उपनगरातील कर्करुग्ण (cancer patients) गेली काही वर्षे या उपचारावाचून वंचित आहे. यामुळे पालिका प्रशासनावर आरोप होत असून रुग्णांकडून हे यंत्र तात्काळ सुरु करण्याची मागणी होत आहे.

कर्करुग्णांना वरदान ठरणाऱ्या या लिनिअर ऍक्सीलेटर मशिनच्या दुरुस्तीसाठी तात्काळ १२ कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी आमदार रविंद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्याकडून होत आहे. वायकर यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयातील विविधी प्रश्नांच्या समस्यांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांची भेट घेतली. 

यावेळी विशेष कार्य अधिकारी महारुद्र कुंभारे यांनी रुग्णालयात सद्यस्थितीत देण्यात येणाऱ्या सेवासुविधा तसेच उपचारांची माहिती आमदार वायकर यांना दिली. सेवन हिल्स रुग्णालयात कॅन्सर पेशंटला रेडिएशन (radiation) देण्यासाठी एक विभाग सुरू होता. या विभागामार्फत दरदिवशी सुमारे ८० ते १०० माणसांना रेडिएशन देण्यात येत होते. मात्र, कोविडच्या काळात संपुर्ण रुग्णालय कोविड पेशंटसाठी राखीव ठेवण्यात आल्याने हा विभाग बंद होता. 

संपुर्ण दोन वर्षे हा विभाग बंद राहिल्याने रेडिएशन देणारे लिनिअर ऍक्सीलेटर मशिन (Linear Accelerator Machine : LINAC) बिघडले. हे मशिन दुरुस्त करण्यासाठी फक्त १२ कोटी रुपयांची गरज असून आवश्यक डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च यासाठी ३ कोटी रुपये असे मिळून एकुण १५ कोटी रुपये खर्चाची आवश्यकता आहे. मात्र, ही रक्कम मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अद्याप न मिळाल्याने कॅन्सर रुग्ण या सुविधेपासून वंचित आहेत. 

सद्यस्थितीत दरदिवशी सुमारे ८० ते १०० रुग्ण रेडिएशनसाठी रुग्णालयात येतात. परंतु ही सुविधा बंद असल्याने उपनगरातील अनेक कॅन्सर रुग्णांना सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे ही सुविधा पुन्हा सुरू करुन रुग्णांना दिलासा देण्यासाठी मशिन दुरुस्तीसाठी आवश्यक १२ कोटी व तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक ३ कोटी रुपये देण्यात यावेत,  तसा प्रस्ताव तयार करुन आयुक्तांकडून त्यास मंजुरी घेण्यात यावी, अशी सुचना आमदार वायकर यांनी उपायुक्त संजय कुऱ्हाडे  यांना केली आहे. 

टाटा रुग्णालयावर (Tata Hospital) भार कमी करण्याबरोबरच या रुग्णालयात १०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशीही सुचना वायकर यांनी यावेळी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here