Twitter : @maharashtracity

मुंबई :

राज्य सरकारच्या रुग्णालयात गुरुवारी डॉक्टरांनी निदर्शने केली. काळ्या फिती लावून कामे करुन नांदेड येथील घटनेचा त्यांनी निषेध केला. नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना खासदार हेमंत पाटील यांनी शौचालय साफ करण्यास लावले. तेवढ्यावर न थांबता त्याचे चित्रीकरण करुन दुसऱ्या दिवशी देखील शौचलयात स्वच्छता नसल्यास हाताने साफ करण्यास लावू असा दम अधिष्ठाता यांना भरला. एखाद्या उच्च पदस्थ डॉक्टरांसोबत अशी वागणूक करणे निंदनीय असून या घटनेचा निषेध करत खा. पाटील यांनी माफी मागावी. माफी न मागितल्यास राज्यभरातील डॉक्टर तीव्र आंदोलन करणार असून आरोग्य सेवा ढासळल्यास सरकार जबाबदार राहिल, असा इशारा डॉक्टर वर्गाकडून देण्यात आला आहे. या निदर्शनात मध्यवर्ती मार्ड, स्थानिक मार्ड आणि डॉक्टरांच्या संघटना उतरल्या आहेत. मुंबईतील राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय परिसरात निषेध निदर्शने करण्यात आली.

डॉक्टरच सॉफ्ट टार्गेट

रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन किंवा बहुतांश उपकरणे चालू नाही. कोणत्याही बंद उपकरणांची पत्रे शासनाकडे जातात. त्याची स्मरणपत्रे सुद्धा पाठवली जातात. मात्र सुविधा न मिळणाऱ्या रुग्णांना डॉक्टरच दिसतात. त्यांना सोयी सुविधा, मनुष्यबळ तुटवडा आदि बाबी दिसत नाहीत. या गोष्टी शासनाने पुरवणे गरजेचे आहे. या सुविधा पुरविण्यासाठी डॉक्टरांनी काय मंत्रालयात फेऱ्या मारत बसायचे का, अशा वेळी डॉक्टरांनाच सॉफ्ट टार्गेट केले जाते. काही वेळा पॉलिटिकल स्टंट असतात. सतत डॉक्टरांची चूक काढली जाते. मात्र रुग्णालयात किती असुविधा आहेत, हे प्रत्यक्ष फिरले की दिसून येईल. ही असुविधा केवळ नांदेड, औरंगाबाद किंवा ठाण्यातील रुग्णालयांत नाही, तर ती राज्यभरातील सरकारी रुग्णालयात आहे. प्रत्येक वेळी डॉक्टरच चुकीचे असू कसे शकतात. हीच वेळ सरकारी यंत्रणेला जाब विचारण्याची आहे.
डॉ. अभिजीत जोशी, जे जे रुग्णालय.  

सरकार स्वतःचे अपयश लपवते
नेहमीच डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट ठरवून त्यांच्यावरच आरोप केले जातात. ते अत्यंत चुकीचे आहे. नांदेडमध्ये झालेल्या घटनेत एखाद्या रुग्णालयाच्या अधिष्ठात्याला शौचालय साफ करण्यास लावणे ही अपमानस्पद आहे. ती संतापजनक घटना आहे. या उपरांत ही खासदार पाटील यांनी ते शौचालय स्वच्छ न राहिल्यास हाताने स्वच्छ करण्यास लावू, अशी भाषा वापरणेच चुकीचे आहे. सरकारचीच चूक असताना एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर सर्व आरोप टाकून त्यांना असे वागवणे चुकीचे आहे. त्यामुळे मध्यवर्ती मार्ड तसेच प्रत्येक स्थानिक मार्डकडून मागणी करण्यात येत आहे की, सरकारने त्या खासदारासंना समज द्यावी. खासदार हेमंत पाटील यांनी जाहिर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा राज्यातील सर्व डॉक्टर तीव्र आंदोलन छेडतील. तसेच त्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होईल् त्याला सरकारच जबाबदार राहिल.
– डॉ. अभिजीत हेलगे, मध्यवर्ती मार्ड अध्यक्ष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here