आत्मदहन आंदोलन मागे

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई : अग्निशामक भरती संबंधी प्रसिद्ध झालेल्या पात्रता यादीच्या विरोधात आज पुकारलेले आत्मदहन आंदोलन आंदोलकांनी मागे घेतले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत 100 उमेदवारांची व्हिडीओ तपासणी उमेदवारांच्या समक्ष करुन त्यांच्या तक्रारीचे निरासरण केले जाणार आहे, असे आंदोलकांसमवेत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरले आहे.

अग्निशामक भरती प्रक्रियाची गुणवत्ता यादी 11 मे 2023 रोजी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली होती. मात्र यादीत अनेक पात्र उमेदवारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य कार्यालयात आज आत्मदहन आंदोनल करण्याचा इशारा दिला होता. यासंबंधी त्यांनी व्हाट्सअप द्वारे पत्र जाहीर केले होते.

आत्मदहन आंदोलनाची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य कार्यालयाच्या आसपास पोलीस बंदोबस्त वाढविला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास गुट्टे हे अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी योग्य ते सहकार्य करत प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांच्यासोबत गुट्टे आणि त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घडवून आणली.

बैठकीत गुट्टे व त्यांचे प्रतिनिधी, प्रमुख अग्निशमन अधिकारी मांजरेकर, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबूलेकर यांच्यासोबत साहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल शिंदे, व आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. गुट्टे यांनी प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना त्यांचे निवेदन सादर केले. चर्चेअंती प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी गुट्टे यांना ज्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे, असे वाटत असेल, अशा 50 उमेदवारांची यादी तयार करावी. त्या उमेदवारांची व्हिडिओ तपासणी सदर उमेदवारांच्या समक्ष करण्यात येईल, असे स्पष केले. त्यावर गुट्टे यांनी अन्याय झालेल्या 100 उमेदवारांची व्हिडीओ तपासणीची मागणी केली असता प्रमुख अग्निशमन अधिकारी मांजरेकर यांनी त्यांची मागणी मान्य केली.

येत्या 23 मे 2023 पर्यंत 100 उमेदवारांची यादी मुंबई अग्निशमन दलाला सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे. तसेच 30 मे 2023 पर्यंत उमेदवारांना व्हिडीओ तपासणीकरिता अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य कार्यालयात बोलविण्यात येणार आहे. व्हिडीओ तपासणीकरिता कार्यालयीन कामकाजामुळे वेळ लागल्यास अधिक दोन ते पाच दिवस मुदत वाढविण्यात येईल तसे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे, असे बैठकीत ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here