गजानन कीर्तिकार× अमोल कीर्तिकर!
By Milind Mane
Twitter: @manemilind70
मुंबई: मुंबईतील शिवसेनेचे अस्तित्व कायम राखण्यासाठी व शिवसेना शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात घरातच सुरुंग लावून त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.
या निर्णयामुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तसेच विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना मोठा धक्का बसला असून कदाचित ते लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत शिवसेनामध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची व आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मागील निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार परंतु शिंदे गटाकडे गेलेल्या खासदारांच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत गोपनीय चर्चा केल्याचे समजते.
या बैठकीत मुंबईमधील उत्तर – पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान प्रतोद व माजी महापौर सुनील प्रभू यांना निवडणूक लढण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. मात्र माझ्या ऐवजी अमोल कीर्तीकारांना उमेदवारी देऊन बंडखोरी करणाऱ्या गजानन कीर्तिकरांना घरचा रस्ता दाखवा, अशी सूचना करून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यात असमर्थता दर्शविल्याचे समजते.
उत्तर – पश्चिम लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी अखेरच्या क्षणी व तब्येत बरी नसताना देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाला घरातूनच म्हणजे त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी पहिल्यापासून विरोध दर्शविला होता. मात्र, अमोल कीर्तिकर यांचा विरोध डावलून गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे अमोल कीर्तीकर कमालीचे नाराज झाले होते.
अमोल कीर्तीकरसारखे उमदे नेतृत्व शिवसेना, युवासेनेकडे असताना त्यांचा विधानसभेसाठी विचार करण्याची शक्यता शिवसेनेतून वर्तवली जात होती. मात्र अचानकपणे राजकारणाची दिशा बदलल्याने व बंडखोरी करणाऱ्यांना चपराक देण्यासाठी अमोल कीर्तीकर यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा चंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. त्या दृष्टीने त्यांनी अमोल यांना तयारी करण्यास देखील सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय रविवारपासून बैठक आयोजित केली आहे. त्यानुसार त्याची सुरुवात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या विभाग क्रमांक बाराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे रविवारी चार वाजता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. याचप्रमाणे मुंबईतील सर्वच म्हणजे सहाही लोकसभा मतदारसंघाचा व या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा व त्या विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या प्रभागामधील नगरसेवकांचा व त्या प्रभागामधील मतदारांच्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचे काम उद्धव ठाकरे गटाकडून जोमाने चालू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व बंड शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नाले सफाईचा पाहणी दौरा आयोजित केला होता. ते एक कारण होते. मात्र त्यानिमित्ताने मुंबईतील लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील चाचपणी करण्याची एक खेळी या निमित्ताने त्यांनी खेळण्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असतील की नाही, कारण त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. अशा परिस्थितीत जर मुलगा घरातून आपल्या विरोधात उभा राहिला तर या मतदारसंघातील युवा नेतृत्व व जुने शिवसैनिक यांचा पुरेपूर पाठिंबा अमोल कीर्तीकर यांना मिळणार आहे. त्यामुळे या वयात आपल्या मुलाकडून आपला पराभव करून घ्यायचा का याची चिंता गजानन कीर्तिकर यांना पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी गजानन कीर्तिकर हे निवडणुकीच्या आखाड्यात असतील का हा येणारा काळच ठरवेल.
मात्र, बाप बेटामधील लढाई झालीच तर मुंबईतील ही काटे की टक्कर म्हणण्यापेक्षा अमोल कीर्तीकर यांचा शिवसैनिकांमधील व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संपर्क पाहता त्यांचा विजयाचा मार्ग सुकर दिसत असल्याचे चित्र या मतदारसंघात सद्यस्थितीत पाहण्यास मिळत आहे.
शिवसेनेचे प्रतोद व माजी महापौर व विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी पद्धतशीरपणे अमोल कीर्तीकर यांचे नाव खासदारकीसाठी सुचवून गजानन कीर्तीकरांची वाट मुलामार्फतच लोकसभेत जाण्यापासून रोखल्याची चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ऐकण्यास मिळत आहे.