६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन

Twitter: @maharashtracity 

मुंबई: मुंबई महापालिकेसह राज्य सरकारच्या रुग्णालयात आता मास्क सक्ती करण्यात आली आहे. तर ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावण्याच्या सुचना मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत. 

कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, महानगरपालिका रुग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रूग्ण, अभ्यागत यांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करणार असून कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व बाबींचा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यांनी घेतलेल्या बैठकीत मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णसंख्या (Covid patients) वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार, मे महिन्यात कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. 

विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी आदेश दिले आहेत.

पालिका प्रशासन सज्ज

कोविड नियंत्रणासाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासह खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही खाटा सज्ज ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स (PPE kits) औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्रीची आवश्यकता असल्यास खरेदी प्रक्रिया सुरु करावी. सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (medical oxygen plants) कार्यरत आहेत का, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा सुयोग्य आहे का याचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे. 

रूग्ण व्यवस्थापनात नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) तातडीने कार्यरत राहतील याची खबरदारी घेण्यात यावी, तसेच कोविड जनजागृतीवर भर द्यावा, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालयांनी मॉक ड्रिल (mock drill) करावे. शिवाय खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी. कोविड रूग्णांच्या गृह विलगीकरण (home isolation) नव्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here