By Yogesh Trivedi

Twitter: @maharashtracity

मुंबई: नारायणराव, आपण बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निस्वार्थ भावनेने उभे असता. आपण वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन या वयात कुटुंबाची जबाबदारी पार पाडता.  स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही पदरमोड करून मृत जखमींवर मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करीत असता. दिवसेंदिवस लोप पावत असलेली मानवता, समाजातील माणसं जात, धर्म, पंथ राजकारणातील गटबाजीत विभागत चाललेली असतांना तसेच धनदांडगे आर्थिक संपन्न समृद्ध मंडळींचा ‘आपल्याला काय त्याचे’ अशी कोरडी, स्वार्थी, आत्मकेंद्री वृत्ती यामुळे आपली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दीपस्तंभासारखी समाजाला सदैव मार्गदर्शक राहील. आपल्या या महान कार्याकडे पाहून आम्हाला ‘बाबा आमटे’ यांच्या कुष्ठरोगी सेवेची आठवण आल्याशिवाय रहात नाही, अशा शब्दांत बोरीवली येथील वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांडुरंग पारदळे यांना फन लीडर फौंडेशन, प्रबोधन गोरेगाव आणि कवितांगण परिवाराने गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात हजारोंच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. 

बोरीवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पारदळे हे वृत्तपत्र विक्रीचा (newspapers vendor) व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात रेल्वे अपघातातील सुमारे चाळीसहून अधिक बेवारस मृतांच्या पार्थिवावर नारायणराव पारदळे यांनी स्वतः पदरमोड करून अंत्यसंस्कार केले. फलाटावर अनाथ म्हणून वावरणाऱ्यांना सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोनातून सहकार्य केले. अशावेळी अनेक संकटांचा धीराने सामना केला. पत्नी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता मुलगा आणि मुलींचा सांभाळ केला. स्वतःच्या प्रकृतीची तमा बाळगली नाही. आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून वयाच्या ७२ व्या वर्षी सुद्धा ते कार्यरत आहेत. 

नारायणराव पारदळे यांचा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वि. स. पागे अध्यासन केंद्राचे संचालक निलेश मदाने (Nilesh Madane) यांच्या हस्ते हा सत्कार कवितांगण परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार पंकज दळवी, ईशान संगमनेरकर, संदीप बाक्रे आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आयोजित केला होता. या ह्रुदय हेलावून टाकणाऱ्या सोहोळ्यास नारायणराव पारदळे यांची कन्या स्मिता पारदळे जंगम, जावई विजय जंगम हे आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here