देशात मान्सून ४ जून रोजी दाखल होणार 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यंदा केरळात ४ जूनच्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. या तारखेचा हवाला घेतल्यास मुंबईत १५ जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी लावला आहे. दरम्यान तोपर्यंत उकाड्याने मुंबईकरांची घालमेल सुरू असून विदर्भ आणि खांनदेशात धुळीच्या लोटासह वावटळीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, सरासरी १ जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यंदा मात्र चार दिवस उशिराने अपेक्षित आहे. त्यातही कमी अधिक चार दिवसाचा फरक जमेस धरला आहे. म्हणजे  तो केरळात १ जून ते ८ जून या  ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो. तसेच मान्सूनची केरळातील सरासरी तारीख १ जून धरल्यास साधारण १० जून रोजी मुंबईत सलामी देतो. तो कदाचित यंदा १५ जूनला मुंबईत दाखल होवु शकतो. त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन मुंबईत १० ते १८ जूनच्या दरम्यान केंव्हाही होवु शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. आजपासुन १ महिन्यानंतरच उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची भेट अपेक्षित असल्याचे खुळे म्हणाले.

तुर्तास किनारपट्टीवर काहिली कायम 

दिवसाचे कमाल उच्च तापमान व आर्द्रता युक्त व गरम अशा हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम असुन अजुनही पुढील २ ते ३ दिवस म्हणजे शनिवार २० मे पर्यन्त जाणवू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश (नंदुरबार, धुळे, जळगांव) व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस म्हणजे गुरुवार १८ मेपर्यन्त उष्णतेबरोबरच वेगवान धुळीचे लोट उठवणाऱ्या  वाऱ्यामुळे वावटळींची शक्यता जाणवते. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पुढील ५ दिवस तापमानात फरक जाणवणार नसल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here