Twitter : @maharashtracity

मुंबई

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून गेल्या एक वर्ष एक महिन्याच्या कालावधीत राज्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशी भावना यावेळी व्यक्त केल्या. याचवेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल तसेच व्हॉट्सअॅप हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान वर्षभरातील आढावा घेणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. तसेच वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ’रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.  

या प्रसंगी शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटीचा आकडा कधी पोहोचला हे समजले सुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाही, मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो.

आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी हमी सरकारने घेतली असल्याचे शिंदे म्हणाले. आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे.  एक सही एखाद्याला उपचार देत असेल, त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात असेही शिंदे म्हणाले.

अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात. कोरोना काळात आपली माणसं परकी झाली होती. या परिस्थितीमध्ये कोरोना काळात एक टीम म्हणून काम केलं. कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलेलं नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम सुरु असल्याचे ही त्यांनी सांगितले. तर विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना स्वतः सेवेचे दूत बनून लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here