Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारी सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस अद्याप ही मान्सून पूर्व सरिमध्ये मोडत असून ४८ तास अशीच वातावरणीय स्थिती कायम  राहिली तरच मुंबईत मान्सूनचा प्रवेश घोषित करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तूर्तास शुक्रवारी मुंबईत चांगला पाऊस झाला असून वातावरणात गारवा पसरला आहे.

दरम्यान, उपनगरात २७ मिमी पावसाची तर शहरांत १.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईत सर्व ठिकाणी पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी दमदार पाऊस झाला. शहर आणि उपनगरात पावसाचा जोर होता. पूर्व उपनगरात तुलनेने पावसाचा जोर अधिक होता. दिवसभराच्या पावसामुळे मुंबईतील कमाल तापमानात प्रचंड घट झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. 

लोअर परळ, दादर, माटुंगा यासह मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहार या ठिकाणी पावसाचा जोर होता. तर गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली या भागातही पावसाने दमदार बॅटिंग केली. सकाळ पासूनच या ठिकाणी पाऊस सुरु झाला.  सायंकाळपर्यंत पावसाच्या सरिंचे ये – जा सुरु होते. कुर्ला कमानी तसेच विमानतळ परिसरात काही काळासाठी पावसाचा जोर होता. 

बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मुंबईसाठी विशेष इशारा वृत्त प्रसारित केले. त्यानुसार आगामी ४ ते ५ तासासाठी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून रविवारपर्यंत हा जोर कायम राहणार आहे. 

वाळकेश्वरमध्ये गाड्यांचे नुकसान :

मुंबईतील दमदार पावसामुळे काही ठिकाणाहून तक्रारी करण्यात आल्या. शनिवारी शहर तसेच उपनगरात मुसळधार पावसाला वाऱ्याची साथ होती. ३० ते ४० प्रति किमी प्रति तास वाऱ्याच्या वेगमुळे पालिकेकडे झाडे कोसळण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मलबार हिल बिर्ला शाळेच्या समोर झाड कोसळले. परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांवर हा वृक्ष कोसळला. यातून दहा गाड्यांचे नुकसान झाले असल्याचे पालिकेच्या अपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

“गेल्या २४ तासापासून कोकणात मान्सून सक्रिय झाल्याने कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मान्सून रेषा अलिबागपर्यंत वाढली असून येत्या ४८ तासात मान्सून मुंबईत प्रवेश करेल. मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांना इशारा घोषित करण्यात आला आहे.”

– सुषमा नायर, शास्त्रज्ञ, हवामानशास्त्र विभाग, मुंबई वेधशाळा.

मुंबई साठी ऑरेंज अलर्ट :
शनिवारी सकाळी ८ पासून रात्री ९ पर्यंत शहरांत ७१ मिमी, पूर्व उपनगरात ७९ मिमी तर पश्चिम उपनगरात ९६ मिमी एवढा पाऊस झाला असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमान नोंद केंद्र कडून देण्यात आली. तसेंच सायंकाळी उशिरा मुंबईला आगामी २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला असल्याचे हवामानशास्त्र विभाग कडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here