जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य 

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्य सेवेमध्ये हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची एकूण संख्या वाढून आता १५१ झाली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन ४४ आपला दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. तसेच फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा, मानसिक विकारांची पडताळणी करणारी मनशक्ती क्लिनिक सेवा आणि १८ वर्ष वयावरील नागरिकांची दंत तपासणी असे वेगवेगळे उपक्रम देखील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने सुरु करण्यात येत आहेत. यामुळे मुंबईकरांच्या सर्वांगीण आरोग्य सेवेचा दृढ संकल्प प्रत्यक्षात उतरला आहे.

दरम्यान, जगभरात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या स्थापने निमित्त तसेच जागतिक पातळीवर आरोग्याच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करणे, या दृष्टिने या दिवसाचे महत्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेची यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षाची संकल्पना ‘सर्वांसाठी सुदृढ आरोग्य’ अशी आहे. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने वेगवेगळ्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. 

‘आपला दवाखाना’ योजनेमध्ये १०७ दवाखाने कार्यान्वित आहेत. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आता नवीन ४४ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आपला दवाखान्यांची एकूण संख्या आता १५१ इतकी झाली आहे. यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत. तर १२७ दवाखाने आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

येत्या दोन महिन्यांमध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि नेत्ररोग सेवा देखील उपलब्ध होणार आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य स्तरावर मनशक्ती क्लिनिक ही सुविधा मुंबईकरांना दिनांक ७ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ५०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

महानगरपालिकेचे सर्व दवाखाने त्याचप्रमाणे आपला दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या मानसिक विकारांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील उपचारांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महानगरपालिकेच्या नजीकच्या रुग्णालयांत पाठवून उपचार पुरवले जातील. 

तसेच मौखिक कर्करोग ही मोठी समस्या आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप सर्वेक्षण २०२१’ नुसार १३ टक्के मुंबईकर तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये पुरूषांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे मौखिक आरोग्याशी संबंधित तपासणी व निदान वेळीच केल्यास रूग्ण मृत्यू दर कमी करणे शक्य आहे. हा मुद्दा नजरेसमोर ठेवून, महानगरपालिकेचे मुंबईतील ३० क्लिनिक आणि १५ पॉलिक्लिनिकमध्ये १८ वर्षांवरील सर्वांची दंतवैद्यांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here