केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या राज्यांना सुचना

Twitter: @maharashtracity

मुंबई: देशात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याची पाहणी करण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी मॉक ड्रील  (nationwide mock drill in the hospitals) केले जाणार आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. 

राज्यांचे आरोग्यमंत्री, सचिवांशी डॉ. मांडवीय यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी केंद्र तसेच राज्यांना पुन्हा एकत्रित होऊन कोविडशी लढा द्यावा लागणार असल्याचे डॉ. मांडवीय यांनी सांगितले. मागच्या कोविड लाटांच्या वेळी आपण एकत्र लढा दिला. आता त्याप्रमाणे पुन्हा एकदा एकत्र येऊन कोविड विरोधात लढा द्यायचा असल्याचे डॉ. मांडवीय म्हणाले. 

दरम्यान, दहशतवादी हल्ला झाल्यास सुरक्षा सुविधांची तपासणी करण्यासाठी मॉक ड्रील केले जाते. त्याच धर्तीवर आरोग्य यंत्रणा कितपत सजग आहे याचे मुल्यमापन या मॉकड्रिलमधून करण्यात येणार आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी रुग्णसंख्येचा विचार करून रुग्णालयांना पुढील स्थितीसाठी तयार रहायला हवे. श्वसनाचा गंभीर त्रास असलेल्या व्यक्तींची कोविड चाचणी वेळीच केली पाहिजे. जेणेकरून कोणत्या विभागांमध्ये कोविड रुग्ण आहेत याचा अंदाज घेता येईल आणि चाचण्या वाढवता येतील. 

सर्व रुग्णालयांनी औषधे, बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सीजन यंत्रणा, मनुष्यबळ यांची सज्जता करून ठेवावी अशा अनेक सुचना यावेळी देण्यात आल्या. रुग्णालये कोविडचा सामना करण्यासाठी कितपत सज्ज आहेत, त्याची संपूर्ण माहिती रुग्णालयांनी तातडीने द्यावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून तगादा लावला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here