Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व भागात असलेले चिनाय कॉलेज व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने बंद करुन हजारो विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. हे कॉलेज सुरु ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असतानाही मुजोर व्यवस्थापन मात्र कॉलेज सुरु करत नाही. अनुदानित असलेले चिनाय कॉलेज तातडीने सुरु करावे, यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून उद्या गुरुवार दि. १८ मे २०२३ रोजी उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस व NSUI कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठे आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, धर्मादाय आयुक्त यांनी चिनाय कॉलेज व्यवस्थापनाची मागणी धुडकावून लावत कॉलेज पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले असतानाही मागील काही वर्षांपासून हे कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. अंधेरीतील मोक्याच्या जागी चिनाय महाविद्यालय असून ८००० विद्यार्थी क्षमता, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, १५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पूर्ण अनुदानित असलेली ही शैक्षणिक संस्था कायमची बंद झाल्यास अंधेरी परिसरातील सामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्य सरकार कॉलेज व्यवस्थापनासमोर गुडघे का टेकत आहे? यामागे काही ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाले आहेत का? असा संतप्त सवाल विचारत राजेश शर्मा यांनी कॉलेज सुरु होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. उद्याच्या आंदोलनात काँग्रेस व NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कॉलेज व्यवस्थापना विरोधात आवाज उठवणार आहेत, असेही शर्मा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here