एकूण बावीसशे उष्माघात रुग्णांची नोंद
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यात कमाल तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला असताना वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेचे विकार तसेच आजारही वाढत आहेत. या उष्णतेचा फटका राज्याला बसला असून उष्माघातामुळे राज्यात जानेवारी २०२३ ते आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. आतापर्यंत उष्माघाताचे २,२५३ रुग्ण आढळले आहेत.
गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरिराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो.
उष्माघातापासून बचावासाठी :
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा.
3 ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करू नका :
उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
कष्टाची कामे उन्हात करू नका.
पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका.
उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.