@maharashtracity

मुंबईतील लसीचे दोन डोस घेतलेले १८ लाख नागरिक
एमएमआर रिजनमधील १० -१२ लाख नागरिक
मुंबईतील अंदाजे ९ लाख नागरिकांनाच रेल्वे प्रवास करणे शक्य होणार
६५ रेल्वे स्थानके व पालिका वार्डात ओळखपत्र

मुंबई: लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट ऍपद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने ६५ रेल्वे स्थानकांवर आणि पालिका वार्ड कार्यालयात ओळखपत्र देण्यात येणार आहे.

यासंदर्भातील माहिती, पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी, ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल, असे रविवारी रात्री जाहीर केले.

मात्र त्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून (BMC) अशा नागरिकांना एका विशिष्ट ऍपच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ ओळखपत्र देण्यात येणार आहे. येत्या दोन ऍप तयार झाल्यावर प्रधान सचिव असीम गुप्ता हे त्याबाबतची घोषणा करणार आहेत. या ऍपद्वारे संबंधितांना क्यूआरकोड (QR code) देण्यात येणार आहे. त्यांनंतरच संबंधितांना रेल्वे तिकीट, पास मिळणे सुलभ होणार आहे.

मात्र जर ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नसेल तर अशा व्यक्तींना ‘ऑफलाईन’ पद्धतीने ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.

ज्या नागरिकांना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस उलटले असतील तर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज (antibodies) तयार होतात. त्यामुळे अशा नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासाठी पालिका व सरकारकडून ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून ओळखपत्र दिले जाईल. मात्र ज्या नागरिकांकडे स्मार्ट फोन नाहीत, अशा नागरिकांना ऑफलाईन ओळखपत्र दिले जाईल. येत्या दोन दिवसांत ऍप तयार करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

मुंबईत ७५ लाख नागरिकांचे लसीकरण ; १८ लाख नागरिकांना दोन डोस

मुंबईत १६ जानेवारी २०२१ ला लसीकरण सुरू केल्यापासून आतापर्यंत एकूण ७५ लाख १५ हजार ५१७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ५६ लाख ४५ हजार ९४५ नागरिकांना लसीचे पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर १८ लाख ६९ हजार ५७२ नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर एमएमआर रिजनमधील (MMR region) ठाणे (Thane), अंबरनाथ (Ambernath), डोंबिवली (Dombivli), नवी मुंबई (Navi Mumbai), मीरा रोड (Mira Road), भाईंदर (Bhayander), कल्याण (Kalyan) आदी भागात लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या अंदाजे १० – १२ लाख एवढी आहे.

मुंबईमधील एकूण ६१ टक्के नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. खासगी कॉर्पोरेट संस्थांच्या सीएसआर फंडाचा (CSR Fund) वापर करून मोफत लसीकरण (vaccination) केले जात आहे. यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत मुंबईकरांना लसीचे डोस दिले जातील असे आयुक्तांनी सांगितले.

सध्या दोन डोस घेतलेल्या ९ लाख नागरिकांनाच रेल्वे प्रवास शक्य

मुंबईत आतापर्यंत ७५ लाख १५ हजार ५१७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र त्यापैकी केवळ १८ लाख ६९ हजार ५७२ लोकांनीच लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यापैकी, फ्रंट लाईन वर्कर (Front line workers), हेल्थ वर्कर (Health workers) अशा २ लाख ९६ हजार १५४ लोक अत्यावश्यक सेवेतील असल्याने त्यांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी अगोदरच मिळाली असून ते दररोज ये – जा करतात. त्यामुळे त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही.

तर, लसीचे दोन डोस घेतलेल्या मात्र अंथरुणात खिळून पडलेले, गतिमंद, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, स्तनदा माता, गरोदर महिला यांना सध्या रेल्वे प्रवासाची गरज नाही. मात्र दोन डोस घेतलेल्या १८ – ४४ वयोगटातील १ लाख २८ हजार ३९ नागरिकांना, ४५ ते ५९ वयोगटातील ७ लाख ९१ हजार १२६ नागरिक अशा एकूण ९ लाख १९ हजार १६५ नागरिकांनाच खऱ्या अर्थाने लसीचे दोन डोस घेतल्याने रेल्वे प्रवास करण्याची परवानगीचा उपयोग होईल. मात्र, त्यासाठी त्यांना लसीचे दोन डोस घेऊन ‘अँटीबॉडीज’ तयार होण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी व्यतीत करावा लागणार आहे.

मॉल, रेस्टॉरंट, जिममध्येही क्यूआर कोड आवश्यक

यापुढे लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वे प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. तर त्यांना यापुढे जिम (Gym), हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट (Restaurants), मॉल (Malls) आदी ठिकाणी जायचे झाल्यास तिथेही त्यांना क्युआर कोडची आवश्यकता भासणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here