मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीवकुमार यांचे प्रतिपादन

Twitter: @maharashtracity

मुंबई: जगभरात प्रदूषणाचा ज्वलंत प्रश्न उपस्थित झाला असून त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. मुंबईतही प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र, हवा व ध्वनी प्रदूषण (air and noise pollution) नियंत्रणासाठी लोक सहभागही महत्वाचे असून सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले. 

संयुक्त राष्ट्राच्या (UNO) पर्यावरण सदिच्छादूत, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यासह शिष्टमंडळ भेटीला आले होते. यावेळी मुंबई महानगरपालिका (BMC) आपले काम करत असून प्रशासनाने विभाग स्तरीय कार्यशाळा आयोजित कराव्यात. जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाद्वारे प्रदूषण नियंत्रणाची गरज, त्यासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम याबाबत अवगत करावे, जेणेकरुन भावी पिढी सजग होवून लोकसहभाग वाढण्यास मदत होईल, असे उद्गार अभिनेत्री दिया मिर्झा यांनी यावेळी काढले.

दरम्यान, शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका, आयआयटी, नीरी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, बांधकाम व्यावसायिकांची संघटना, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, वाहतूक नियंत्रण विभाग यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी देखील एकत्र यावे, असे आवाहन यावेळी दिया मिर्झा यांनी केले. 

वायू, ध्वनी व जलप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती, पर्यावरण विषयक स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) प्रतिनिधींनी जाणून घेतली. त्यासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा, आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली, वातावरण फाऊंडेशनच्या श्रृती पांचाळ, रसिका नाचणकर, बीईएजी संस्थेच्या हेमा रमाणी, कार्टर क्लिनअप संस्थेच्या फ्रेशिया बी, एकसाथ फाऊंडेशनचे जीवन माळवदे आदींसह पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली.

मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली जात आहे. यासंबंधातील सर्व भागधारक घटकांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा, राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० मेट्रिक टन प्रतिदिन एवढ्या क्षमतेचे दोन बांधकाम व पाडकाम (कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन वेस्ट) प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा उभारली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा उपयोग करुन हवा प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईत विविध पाच भागात हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार असून चार लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here