मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांचा सवाल
Twitter: @maharashtracity
मुंबई: हिंदू जर एकत्र येत असेल तर त्याला विरोध कशासाठी? तुमच्या पोटात का दुखले? तुम्ही हिंदुत्व सोडले. हिंदू रक्षणाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे. तुमच्या पोटात का दुखले? हिंदू जन आक्रोश मोर्चावर उद्धवजी यांचा आक्षेप का? असा खडा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला. भाजपाला नामशेष करण्याचे तुमचे औरंगजेबी स्वप्नं पुर्ण होणार नाही, असा प्रतिहल्ला आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
औरंगाबाद येथे महाविकास आघाडीच्या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाजपावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले.
यावेळी आ. ॲड. शेलार म्हणाले की, भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांचे विविध राजकीय कार्यक्रम आहेत, ध्येयधोरणे आहेत. पण महाराष्ट्रातील एकमेव उध्दव बाळासाहेब ठाकरे गट हा असा आहे की, त्यांचा कुठला कार्यक्रम नाही, ध्येयधोरणे नाही, विचार नाही. केवळ भाजप काय करतो आहे. इतर पक्ष काय करीत आहेत, त्याची धोरणे काय आहेत. याच्या कार्यक्रमावर भाष्य करा, हे चालू आहे.
शेलार पुढे म्हणाले, तुमचं ध्येय, धोरण विचारधारा काय? काही नाही. दुसऱ्याच्या घरात काय झाले तर पेढे वाटायचे. स्वतःच्या मनासारखे झाले नाही तर रडत बसायचे असे उद्धव ठाकरे यांचे सुरू आहे. या पलीकडे काहीही कारण नसलेला पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट.. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ.. यांना साधंही कळत नाही की, वज्रमूठ एका माणसाची असते. १६ जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात त्याला वज्रमूठ म्हणत नाहीत. १६ चोरांनी मिळून केलेली ही हात मिळवणी आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
इतके वर्ष आमच्याबरोबर राहून त्यांच्या मनातली इच्छा होती. जे त्यांच्या पोटात होतं ते बोलून चुकले. उध्दवजी म्हणाले, भाजपाला नामशेष करू.. त्यांना नामशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे का? असा आमचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीला नामशेष करायचे म्हणजे काय? त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामशेष करायचे होते का?. त्यांना अटक करण्यासाठी केलेला प्रयत्न आता उघड झाला आहे. त्यांना अमित शहा यांना नामशेष करायचे आहे का ? त्यांना आमचं प्रति आव्हान आहे. उद्धवजी, तुम्ही नामुष्कीने जगत आहात. या महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब येवून नामशेष करायची भाषा करत होता. याच महाराष्ट्रात आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धवजी मांडत आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
शेलार म्हणाले, राम मंदिर निर्माण करणाऱ्याला ते नामशेष करायला निघाले आहेत. ३७० कलम, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग ज्यांनी केला त्यांना हे लोक नामशेष करायला निघाले आहेत. पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना नामशेष करायला निघाले आहेत. ८० कोटी गरिबांचे पोट भरणाऱ्यांना नामशेष करायला निघाले आहेत. २७ लाख कोटी थेट गरिबांच्या खात्यात पाठवणाऱ्यांना नामशेष करायला निघाले आहेत. कोरोनाची मोफत लस देणाऱ्यांना नामशेष करायला निघाले आहेत. उद्धवजी, काय काय नामशेष करणार आहात. तुमच्या पोटात असलेलं औरंगजेबी स्वप्न महाराष्ट्रासमोर मांडले आहे. तुम्हाला ते जमू शकणार नाही. तुमची ती ताकद नाही.
या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय करणार आहे ते सांगावे. मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगावे. राष्ट्रीय पातळीवरील धोरण काय सांगावे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रवास अधोगतीकडे चालला आहे. आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर उठला आहे, असाही दावा शेलार यांनी केला.
मुंबईत घडलेल्या तीन घटना पाहता हा प्रवास उद्धवजी यांच्या औरंगजेबी स्वप्नाकडे वाटचाल असल्याचे दिसते. त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप घेतला. आक्षेप एमआयएम, समाजवादी पार्टीने नाही घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीने, मनसेने घेतला नाही. हिंदू जन आक्रोश मोर्चा लव जिहाद आणि लॅंड जिहादवर होता. त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण उद्धवजी यांनी सांगावे हा आमचा प्रश्न आहे.
गिरगावमध्ये यात्रा का अडवली?
गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या हिंदू नववर्षाच्या यात्रेला अडवणूक करणारी तुमची यात्रा आडवी का घातली? यात्रेच्या रस्त्यात अडवणूक करण्याचा कार्यक्रम उद्धवजी यांच्या गटाने का केला? असे प्रश्न उपस्थित करून शेलार म्हणाले, हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेची अडवणूक याचे उत्तर उद्धव ठाकरे यांना द्यावे लागेल. मालवणीमध्ये रामनवमीच्या मिरवणूकीवर हल्ला करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या बाजूने कोण उभं होतं? सहभागी कोण होतं? मालवणीतील रामनवमीच्या मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांच्या बाजूने उद्धवजी यांच्या पक्षाची भूमिका संशयास्पद का होती? उद्धवजी यांनी विचारधारा सोडली. स्वतःच्या वडिलांनी मांडलेले विचार सोडले. हे सगळं कश्यासाठी? केवळ मतासाठी..मतांची बेजमी करण्यासाठी तुम्ही हिंदू जन आक्रोश मोर्चाला आक्षेप घेता. हे केवळ मतांसाठी असून हे महाराष्ट्र पाहतो आहे. सावरकरांचा अपमान आणि बदनामी यामध्ये तुम्हाला शल्य नाही, त्रागा नाही. तुमची प्रतिक्रिया केवळ लुटुपुटू खेळासारखी आहे.
राहुल गांधीना महाराष्ट्राची माफी मागायला सांगा
शेलार म्हणाले, आम्ही उद्धवजी यांना नम्र विनंती केली की, राहुल गांधी यांना माफी मागायला सांगा आणि मग त्यांच्याबरोबर बसा. त्यांनी हे केलं नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागितली की, प्रकरण तात्पुरतं बाजूला ठेवलं त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी द्यावे. महाराष्ट्र हे जाणू इच्छितो आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणात बोलायचं टाळलं, थांबवलं आहे. राहुल गांधी किंवा त्यांच्या पक्षाने यावर काहीही म्हंटल नाही. राहुल गांधी यापुढे सावरकरांचा अपमान करणार नाहीत असे म्हटल्याचे ठोस पुरावे उद्धव ठाकरे यांनी द्यावेत. केवळ प्रकरण अंगावर येत आहे म्हणून मतासाठी हे केलं जात आहे. देशभक्तांचा, देशाचा, सावरकरांचा, हिंदूचा आणि भारताचा राहुल गांधी यांनी अपमान केलाच पण उद्धवजी हे महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या पंगतीमध्ये वाढपीची भूमिका उद्धवजी यांचा पक्ष करत आहे.
सावरकर म्हणजे देश सावरकर म्हणजे महाराष्ट्र, सावरकर मराठी माणसांचा मानबिंदू, सावरकर म्हणजे भाषा शुद्धी कार्यक्रमाचे नेतृत्व, सावरकर म्हणजे लिपी शुद्ध कार्यक्रमाचे नेतृत्व, सावरकर म्हणजे मराठीतील उत्तम कवी.. ज्या माणसाने मराठीची इतकी सेवा केली त्या माणसाचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धवजी बसत आहेत. उद्धवजी यांनी भूमिका स्पष्ट करावी. भारतीय जनता पक्षाने मुंबईत १६ सावरकर गौरव यात्रा पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या २० यात्रा पुढील काही दिवसांत पूर्ण होतील, असेही शेलार म्हणाले.
*कार्यक्रमाची दोन तिकीटे पाठवणार*
येत्या ५ तारखेला सावरकर स्मारकामध्ये त्यांच्यावर लिहलेल्या गीतांचा ‘मी सावरकर’ हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांना सन्मानपूर्वक पाठवणार आहोत. हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हे हा सावरकर भक्तांचा कार्यक्रम आहे. केवळ हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेची अडवणूक आणि रामनवमीच्या मालवणीतील यात्रेतून पळवणूक या उद्धवजींच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी करेल याबद्दल दुमत नाही, असेही ते म्हणाले.