दलाने आरोप फेटाळले; आंदोलकांशी चर्चेस तयार

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशामक भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून संपूर्ण भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत शुक्रवारी भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष धनराज गुट्टे यांनी आंदोलन करण्याचा इशारा देणारे पत्र व्हाट्सअपच्या माध्यमातून अग्निशमन दलाला दिले आहे.

दरम्यान, गुट्टे यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून त्यात काही तथ्य नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. तरीही गुट्टे आंदोलन करण्यास आल्यास त्यांना व त्यांच्या प्रतिनिधींना कार्यालयात बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून त्याबाबत त्यांच्याकडून निवेदन ही घेण्यात येईल. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे, असे त्यांना वाटते, त्या उमेदवारांची नावे तसेच इतर माहिती घेऊन त्यांना ठराविक दिवशी बोलावून त्या उमेदवारांचे व्हिडीओ दाखविण्यात येतील, असे मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गुणवत्ता नसताना ही अनेकांची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष गुट्टे यांनी करत संपूर्ण भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.

दरम्यान, संपूर्ण भरती प्रक्रिया म्हणजेच मैदानी चाचणी ही सीसीटीव्ही कॅमेरा व व्हिडीओग्राफी अंतर्गत करण्यात आली होती. तसेच भरती प्रक्रिया ही प्रमुख कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी तसेच मुंबई अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत करण्यात आलेली असून पूर्णपणे पारदर्शक आहे, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 873 उमेदवारांपैकी 15 टक्के म्हणजेच 130 उमेदवारांची भरती दरम्यान केलेल्या मैदानी चाचणीचे व्हिडीओ तपासणी व प्रमाणपत्र तपासणी करण्याकरिता अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. यांच्याद्वारे निवड यादीतील नमूद गुण व पुर्नपडताळणी करुन आलेले गुण याबाबत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश सह आयुक्त यांनी दिले होते. त्यानुसार, दलातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करुन निवड यादीतील नमूद 130 उमेदवारांचे मैदानी चाचणीचे व्हिडीओ तपासणी व प्रमाणपत्र तपासणी करुन पुर्नपडताळणी केली असल्याचे दलाने म्हटले आहे. यावेळी पुर्नपडताळणी केल्यानुसार निवड यादीत नमूद केलेले गुण योग्य असल्याचे आढळून आले. तसेच त्यामधील 3 उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे व्हीडियो तपासणी सह आयुक्त यांनी स्वतः केले आहे, असे ही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई अग्निशमन दलातर्फे अग्निशामक भरती संबंधी प्रसिद्ध झालेल्या पात्रता यादीत काहीही तक्रार असल्यास दलाला संपर्क साधून स्वतःच्या तक्रारीचे निरासरण करु शकता. हवे तर माहितीच्या आधारे ही संबंधीत तक्रारीची माहीत घेऊ शकता, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कोणाच्या ही आमिषाला बळी पडून कोणतेही अनुचित पाऊलही उचलू नका, असे आवाहन करताना तक्रारदार उमेदवारांना योग्य ते सहकार्य करुन त्यांच्या सर्व तक्रारीचे निरासरण केले जाईल, असेही मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here