By Milind Mane

Twitter : @manemilinde70

महाड: रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबे पुलाचा खाडी पात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी काम पूर्ण होत आले असून येत्या 15 जुलैपर्यंत बहुचर्चित आंबेत पूल (Ambet bridge) वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने चालवल्याचे शाखा अभियंता शिवलिंग उलागडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु ,ऑक्टोंबर 2021 मध्ये आंबेत पुलाची पाण्याखालून तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी पुलाचा भाग सुस्थितीत असल्याने पुलाच्या वरील भागाची दुरुस्तीचे काम चालू केले. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये हा पूल धोकादायक बनल्याने त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणात पुलाचा पाया क्रमांक पाच झुकल्याचे स्पष्ट झाले.

आंबेत पुलाचा पिलर भरती व ओहोटीच्या वेळी दोन ते चार मीटरने हलत असल्याचे यांत्रिक साधनाद्वारे दिसून आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी 2022 रोजी या पुलाच्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता इत्यादी या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळेला पूल बंद असल्याने दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांची व प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी रोरो सेवा सुरू करण्याचे निश्चित केले. आंबेत पुलाजवळून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूकडे रो रो सेवा चालू करण्यात आली होती.

आंबेत पुलामुळे रायगड व रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या काळात झाले होते. या पुलावरून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील असणाऱ्या गावांना आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. आंबेत पुलाच्या डागडुजीसाठी 14 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या पुलाचे काम करणाऱ्या टी अँड टी या कंपनीला अद्याप एकही रुपया शासनाकडून प्राप्त झाला नाही, केवळ अधिकारांच्या कौशल्यावर या फुलाच्या दुरुस्तीचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे.

आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम बहुतांशी पूर्णत्वाकडे चालले असून 15 जुलैपर्यंत या पुलावरून पूर्वीसारखीच वाहतूक चालू होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवलिंग उलागडे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here