By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याच्या माध्यमातून भाजपतर्फे रायगड जिल्ह्यात विशेष जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज महाडमध्ये त्याचा शुभारंभ केला. रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती दिसल्याने भाजपाने रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्याची चर्चा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडूनच ऐकण्यास मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली असल्याने भाजपाने विशेष जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क व थेट गावागावातील मतदारांपर्यंत केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवीत आहेत. त्याच माध्यमातून आज महाड येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या उपस्थितीत महाडमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, क्लस्टर संयोजक संजय जी टंडन, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश मपारा, रायगड जिल्हा प्रभारी अतुल काळशेकर, रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर, जिल्हा महिला अध्यक्षा हेमाताई मानकर, महाड तालुका भाजपा सरचिटणीस महेश शिंदे व पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनीतीचा हा भाग असल्याची कुजबूज या कार्यक्रमासाठी जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत होती. लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपाने आतापासूनच निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून खेचण्यासाठी भाजपा गावपातळीवर सक्रिय झाल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

केंद्रात सत्ता असल्याने भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील ज्या लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांनी दौरे आयोजित केले असून या दौऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला केंद्र सरकारच्या योजना व नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील नऊ वर्षात घेतलेल्या धोरणांची रूपरेषा पटवून सांगण्याचे काम भाजपा ने विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here