By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

नागपूर/नवी मुंबई: महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घटना या कनेक्शनची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवी मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. नवी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात, दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाच्या घटना घडतात, याचे मला आश्चर्य वाटते. या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानक कोण पुढे आले आणि त्यांना कोणाची फूस आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण चौकशीअंती त्यावर सविस्तर बोलेनच. पण, विरोधकांच्या दंगलीच्या वक्तव्यांनंतर अनेक जिल्ह्यांत औरंगजेबाचे उदात्तीकरण हा काही साधा योगायोग नाही, याच्या खोलात आम्ही जाऊ. सार्‍याच लोकांचे एका सुरात बोलणे आणि त्याला लगेच एका विशिष्ट समाजातून त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचे उदात्तीकरण, हा योगायोग असूच शकत नाही. औरंगजेब कुणाला जवळचा वाटतो, हे आपल्या सर्वांना ठावूक आहेच.

दरम्यान, नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, याचा शोध घ्यावा लागेल. याच्या मागे कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल. जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी तर अशा अवलादी पैदा केलेल्या नाहीत ना, याचाही शोध घेतला जाईल. कोल्हापूरमध्ये परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलिस बंदोबस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कायदा हाती घेऊ नये.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे औरंग्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही आणि असे करणार्‍यांना माफी नाहीच. महाराष्ट्राचे नाव खराब कोण करतेय, हेही आम्ही शोधून काढू. या घटनांच्या मागे बोलविते धनी कोण, हेही आम्ही शोधून काढू. पण, कुणी कायदा हातात घेतला तर महाराष्ट्राच्या नावलौकिकावर डाग लागतो. कायदा कुणी हातात घेतला, तर कारवाई केली जाईल. औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर संताप होतोच. पण, त्याचा अर्थ कायदा हातात घ्यायचा असे नाही, असेही फडणवीस म्हणाले.

ठाकरे गटाच्या नवीन उपक्रमाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेचे नेते हे जनतेत जाऊन संवाद साधतात, तर जे घरी बसून राजकारण करतात, ते पॉडकास्ट, फेसबुक लाईव्ह करतात. देशात मोदी लाट ओसरली या शरद पवारांच्या विधानाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेब वर्षानुवर्षे स्वप्न पाहतात. 2014, 2019 मध्ये सुद्धा त्यांनी स्वप्न पाहिले. तीच वक्तव्ये त्यांनी या दोन्ही वर्षी केली. परिणाम काय झाला, हेही तुमच्यासमोर आहे. नेमकी तीच विधाने ते आता पुन्हा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here