महाडच्या चांदे क्रीडांगणावर विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजणार!

By Milind Mane

Twitter: @manemilind70

मुंबई: काँग्रेसचे महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या व महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप सहा मे रोजी महाड येथील चांदे क्रीडांगणावर होणाऱ्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. 

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी आज महाड येथे ही माहिती दिली. तसेच महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप याच असतील असेही  अनंत गीते यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड नंतर महाड येथे होणारी ही दुसरी जाहीर सभा असल्याने या सभेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यातच स्नेहल जगताप यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आहे. 

या सभेला उद्धव ठाकरे, शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, गुहागरचे आमदार भास्करराव जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या बुलंद तोफ सुषमाताई अंधारे, रश्मी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते व महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत.

महाड येथील चांदे क्रीडांगणाची पाहणी करताना माजी खासदार अनंतजी गीते यांच्या समवेत माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप, काँग्रेसचे धनंजय देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राऊळ, तालुकाप्रमुख आशिष पळसकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम, रघुवीर देशमुख, जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे, महाडचे माजी नगरसेवक चेतन पोटफोडे, वाहतूक सेनेचे सुभाष मोरे, निलेश धुमाळ, महाड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी जाहीर सभेनिमित्त कार्यकर्त्यांना  सूचना केल्या. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ही महाड मधील न भूतो न भविष्यती अशी असणार असल्याचे माजी खासदार अनंत गीते यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here