शव विच्छेदन अहवालातील निरीक्षणे

खारघर दुर्घटना प्रकरणी एक सदस्यीय समिती स्थापन

Twitter: @maharashtracity

मुंबई: खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ज्या १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला त्याला चार पाच तास प्यायला पाणी मिळाले नाही हे कारण असल्याचे शव विच्छेदन अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, राज्य शासनाने या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी सकाळी ११ वाजेची वेळ निवडण्यात आली. या दरम्यानच्या काही दिवसापासून राज्यात उष्णतेची तीव्र लाट होती. भर उन्हात सुमारे सहा लाख श्री सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय गृह मंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम स्थळी कोणालाही पाण्याची बाटली नेण्यास परवानगी नव्हती. तर श्री सदस्य अगदी सकाळपासून मैदानावर जमले होते.

दुपारी उष्णता वाढू लागली आणि पाणी न मिळाल्याने उष्माघाताने एकेक श्री सदस्य जागेवरच पडू लागले. या संदर्भातील एक नवा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमावर प्रसारित झाला होता.

आता शव विच्छेदन अहवाल समोर आला आहे.

अहवालात मृत्यूच्या कारणात ४ ते ५ तास पाणी न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याचे समजत आहे. दरम्यान, शव विच्छेदन अहवाल पोलिसांनाही सादर केला जातो. मात्र, रुग्णालय प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून यासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here