पर्यटकांच्या गाड्यांचे नुकसान सुदैवाने जखमी नाही

By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या चित्त दरवाजाच्या पायथ्या जवळील पन्नास मीटर भागांमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळून झालेल्या अपघातात पर्यटकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा किल्ले रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक व शिवभक्त हे आपापल्या गाड्या लावून किल्ले रायगडावर गेले होते. आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास चित्त दरवाजाच्या पायथ्याजवळील मार्गावर सुमारे 50 मीटर अंतरावर महाडच्या दिशेने दरड कोसळल्याने या ठिकाणी उभ्या असलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले. तर समोर असलेल्या काही दुकानांना देखील याचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार अमर सावंत नावाच्या व्यक्तीच्या दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. यासंदर्भात स्थानिक प्रशासनामार्फत तातडीने पंचनामा व आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश निर्गमित केल्याची माहिती महाड प्रांत कार्यालयातून देण्यात आली आहे. किल्ले रायगडावर आज पहिल्याच पावसात झालेल्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पर्यटकांमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेच्या धोरणाबद्दल प्रचंड नाराजी ऐकण्यास मिळाली. आज पहिल्याच पावसाला सुरुवात झाली असताना या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नसले तरी शिवभक्तांच्या व पर्यटकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली व गडावर अशाच पद्धतीचे भूस्खलन झाले तर का अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी अशी स्थानिक जनतेकडून चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

एकीकडे महाड महसूल शाखेतील नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या आहेत. अगोदरच संवेदनशील असणाऱ्या महाडमध्ये कोणी अधिकारी येण्यास तयार नाही. त्यातच महसूल शाखेतील महाडमधील पूरजन्य परिस्थिती व दरड प्रवण क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी बदल्या केल्याने नवीन येणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना महाडमधल्या परिस्थितीची कल्पना येण्यास होणारा विलंब व व महाड तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात पडणारे पर्जन्यमान याबाबत नवीन येणारे अधिकारी अनभिज्ञ असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आजच्या रायगडच्या दरडीवरून किती जागरूक राहणे गरजेचे आहे हे सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here