ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांची टीका

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट करत आहे. मात्र, शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांची नसून नरेंद्र मोदी यांच्या टाचेखालची शिवसेना असल्याचे आज सिध्द झाले, अशी टीका ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी येथे प्रसार मध्यामांशी बोलताना केली.

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरला असून त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. शिवसेनेकडून ही जाहिरात दिली असताना त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही, असा सवालही खासदार राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेनेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे, पण बाळासाहेबांचा फोटो नाही. शिंदेंची शिवसेना ज्यांचे नाव घेत आहे, ज्यांच्या विचारांचा वारसा सांगते त्या बाळासाहेबांचा फोटो यामध्ये नाही. मग ही शिवसेना कोणाची, शिंदेंची सेना ही मोदीं आणि शहा यांची सेना आहे. यामुळे त्यांचा खरा मुखवटा आता या जाहिरातीच्या माध्यमातून उघड झाला आहे, अशीही बोचरी टीका राऊत यांनी केली.

जाहिरातीचा खर्च कोणी केला, सर्वे कुठे झाला….?

खा. राऊत म्हणाले की, या जाहिरातीचा खर्च कोणी केला. हा पैसा सरकारच्या तिजोरीतून झाला की त्या दोन हजारांच्या नोटा बाहेर आल्या त्यातून खर्च केला, अशी विचारणाही  राऊत यांनी केली. केलेला सर्वे खरा आहे की, खोटा यामध्ये आम्हाला पडायचे नाही, पण हे सर्वेक्षण कुठे झाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झाले की गुजरातमध्ये झाले, असा प्रश्नही खा. राऊत यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here