जाहिरातबाजीने शिंदे यांनी उलट स्वतः चे हसे करून घेतले
By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: शिवसेना आमचीच अशा प्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु, आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन चाललो आहे आणि उध्दव ठाकरे यांनी त्या विचारांपासून फारकत घेतली असे सांगता. मात्र यांनीच राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पध्दतशीरपणे बाजुला ठेवले आहेत, असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.
जवळपास अनेक वर्ष सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर राहून खासदार आणि आमदार म्हणून ३२ वर्ष काम करतोय. सकाळी पेपर उघडले तर पहिल्या पानावर जाहिरात पहायला मिळाली. मात्र, अशी जाहिरात कधी पाहिली नाही, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.
शिंदे गटाची ही जाहिरात असून त्या गटाचे लोक इतक्या लवकर बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले? अशी शंका उपस्थित करतानाच बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहात म्हणून शिवसेना खेचून घेतली. मग जाहिरातीमध्ये हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो का नाहीत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
या जाहिरातीमध्ये स्वतः च ठरवून सर्वेक्षण केलेले आहे. नेमके कुठे सर्वेक्षण केले, कुणी सांगितले, कुणाला किती टक्के, याचा थांगपत्ता नाही. एक्झिट पोल येतात ते कुणी केले ते सांगतात. मध्यंतरी सकाळने एक सर्व्हे केला. तो सर्व्हे आम्ही केला, असे त्यांनी सांगितले. मात्र, तसा हा सर्व्हे छापून राज्याच्या प्रमुखाने एक विश्वविक्रम केला आहे, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
जाहिरात आपण केलेले काम लोकांपर्यंत पोचावे किंवा जाहिरातीवर मोठा खर्च वेगवेगळ्या एजन्सी का करतात की, लोकांना माहीत होण्यासाठी, जर यांचे काम एवढे चांगले असेल तर अशा पध्दतीच्या पानभर जाहिराती आणि तीपण जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये जो सर्व्हे दाखवला आहे, त्यात एक नंबर एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाकरीता लोकांनी कौल दिला आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पुढे व्हावेत, असे वाटायला लागले आहे, याबद्दल आनंद वाटला, असेही अजित पवार म्हणाले.
इतक्या लोकांचा पाठिंबा आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही. पंधरा दिवसाने या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घ्या सांगत आहोत तरी निवडणूका घेत नाही. यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते आहे, असा हल्लाबोलही अजित पवार यांनी केला.
त्या जाहिरातीमध्ये राज्याच्या विकासाचे सांगितले असते, इतकी बेरोजगारी कमी केली, जीडीपी वाढला आहे तो कमी केला, शेतकर्यांना मदत पोचवली, इतक्या लाभार्थ्यांना या या योजनेत लाभ दिला आहे, हे प्रश्न बाजुलाच राहिले. परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याचीच स्पर्धा सरकारमधील महत्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांमध्ये चाललेली दिसते, असा आरोपही अजित पवार यांनी केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशा पध्दतीने घोषणा भाजपचे लोक देत होते. आता ती घोषणा मागे पडली असून आता ‘राष्ट्रामध्ये मोदी, राज्यात शिंदे’ ही नवीन घोषणा महाराष्ट्रात आली आहे. ही घोषणा भाजपच्या लोकांना द्यावी लागणार आहे. हे भाजप नेत्यांना मान्य आहे का असा सवालही अजित पवार यांनी भाजपला केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेहमी खुलासा करत असतात. पण बावनकुळे तुमचा खुलासा मलाही आता ऐकायला आवडेल, असा मिश्किल टोला लगावतानाच हा तुमचा पक्षातंर्गत प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल ‘अजित पवारने नाक खुपसण्याची काय गरज आहे’ . ‘बरं!.. मी नाही नाक खुपसत’ परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात जाहिरात आहे, त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष आज महत्वाची संख्या असल्यामुळे तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर त्याठिकाणी आहे आणि फडणवीसपेक्षा आता शिंदेंना जनता अनुकूल झाली आहे, असे जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे. भाजपला, त्यांच्या प्रवक्त्यांना, नेत्यांना हे मान्य आहे का? असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे.
या सर्व्हेमध्ये शिंदेच्या बाजूने २६ टक्के कौल दाखवण्यात आला आहे आणि फडणवीस यांना २३ टक्के कौल दाखवला आहे. खरं तर अशा प्रकारच्या पानभर जाहिराती यांना का द्याव्या लागल्या आहेत कळायला मार्ग नाही. तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, सरकारी जाहिरात असती तर मी सरकारच्या पैशाने अशाप्रकारची जाहिरातबाजी करण्याचे कारण नाही, असा जाब विचारला असता. परंतु पक्षाच्यावतीने जाहिरातबाजी केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता इतकी दुधखुळी नाही की काय चाललं आहे आणि कशापद्धतीने चाललं आहे हे कळत नाही, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.
वास्तविक एका वृत्तपत्राने पाच टक्के इतकाच कौल काढला होता. परंतु, त्यानंतर तो चक्क आकाशाला गवसणी घालायला निघाला आहे. त्यामुळे जाहिरात देणार्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे, अशी कोपरखळी अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर केली आहे.
या जाहिरातबाजीने शिंदे यांनी स्वतः चे हसे करून घेतले आहे. तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर मग उद्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा आणि जनतेच्या मैदानावर या. जनतेच्या मैदानावर जनता कुणाच्या पाठीशी किती आहे, मविआच्या पाठीशी किती आहे, शिंदे गटाच्या व भाजपच्या पाठीशी किती आहे, हे चित्र स्पष्टपणे पहायला मिळेल, असे जाहीर आव्हानही अजित पवार यांनी दिले.