By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात चाललेली हुकूमशाही व दडपशाही यापुढे खपवून घेणार नाही. त्या विरोधात कायद्याच्या माध्यमातूनच ठोस उत्तर दिले जाईल, असा इशारा देतानाच आमदार भरत गोगावले यांचा किमान पन्नास हजार मतांनी पराभव करु, असा दावा शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाडमध्ये हुकूमशाही व दडपशाही चालली आहे. महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून नवीन नेतृत्व उदयास येत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इथले राजकीय चित्र बदलण्याची ताकद स्नेहल जगताप यांच्याकडे असल्याने त्या नेतृत्वाकडे बघूनच आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले

आमदार पुत्र विकास गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार अनंत गीते व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून ओझर्डे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

राजकारणात टीका करीत असताना काही नैतिकता व तारतरम्य बाळगणे गरजेचे आहे. मात्र माजी खासदार अनंत गीते यांच्यावर आमदार पुत्र गोगावले यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना ओझर्डे म्हणाले की, आमदार पुत्र यांचे जेवढे वय नाही तेवढी वर्षे गीते यांनी खासदारकी केली आहे. त्यामुळे टीका करताना वैचारिक पातळी सोडून टीका करू नये, अशा शब्दात ओझर्डे यांनी विकास गोगावले यांना समज दिली.

विकास गोगावले यांनी पत्रकार परिषदेत स्वतः चा उल्लेख गुंड म्हणून केला. ओझर्डे म्हणाले, विकास गोगावले यांची ते स्वतःला गुंड म्हणत असल्याची कबूली देणारी व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात सादर करून विकास गोगावले यांना तडीपार करण्यास कायद्याच्या माध्यमातून सांगू शकतो, असा इशारा ओझर्डे यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीत जनता नव्हे तर त्यांचे पुत्रच आमदार गोगावले यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास ओझर्डे यांनी व्यक्त केला.

रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांनी पंधरा वर्षात कोणताच विकास केला नाही असे विकास गोगावले सांगत आहेत. त्याबाबत बोलताना ओझर्डे म्हणाले की गोगावले आमदारकीची तिसरी टर्म उपभोगत आहेत. त्यांनी मतदार संघाचा काय विकास केला? हे जनतेला आधी सांगावे. जी काही विकास कामे आणली, ती तुमच्या पोळ्या भाजण्यासाठी आणली आहेत, अशी टीका ओझर्डे यांनी केली

उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी बघूनच विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते विरोधकांवर असे बिनबुडाच्या आरोप करत सुटले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला येणारी गर्दी ही पैसे देऊन आणलेली नसून ती पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी स्वतःहून आलेली जनता होती,  असे ओझर्डे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here