X : @MilindMane70
महाड: महाडमधून मोटर सायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. त्याने दिलेल्या माहितीनुसार इतर मोटरसायकल चोरांनादेखील (motorcycle theives) अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध ठिकाणावरून चोरलेल्या बाईक ताब्यात घेतल्या आहेत.
याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे (DYSP Shankar Kale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडमधून मोटर सायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य दोघांना इतर ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांकडून विविध ठिकाणी चोरलेल्या आणि विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटार सायकलदेखील महाड औद्योगिक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
रुपेश शंकर पवार, राहणार टेमघर यांनी त्यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल घराच्या अंगणात पार्किंग केली असता दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला असता आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार सागर विरेंद्र सिंग सोळंकी रा.
आदर्श नगर, बिरवाडी याला शिताफीने पकडण्यात आले. त्याने युवराज विठोबा जगताप (27), सुहास रमेश नाईलकर, रुपवली यांची नावे सांगितल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
या सर्व मोटरसायकल भिवंडी, प्रतापगड, मंडणगड, रुपवली, महाड ,साकडी, कुसगाव, चिंबावे, येथून ताब्यात घेतल्या आहेत. या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर, सिद्धेश मोरे, राजेश माने, सतीश बोटे, शितल बंडगर, पवन बारवकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे (ASI Maruti Andhale) यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोटर सायकल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भादवि कलम 379 प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे.