X : @milindmane70
महाड: वल्हव रे नाखवा वल्हव…वल्हव म्हणत होडीतील नाखव्याने भरतीचे पाणी आणि सोसाट्याचा वारा सहन करत स्पर्धेतील आपले लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला. मागील अनेक वर्ष खाडी पट्ट्यातील दासगावकर भोई समाज उदरनिर्वाह करण्यासाठी मासेमारी करून आपले कुटुंब चालवत आहेत.
“भोईराज माझा दर्याचा राजा ” श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप, दासगाव या भोई समाजातील तरुणांनी आयोजित केलेल्या होडी स्पर्धेत परिसरातील ग्रामस्थांनी हा रोमांचक थरार अनुभवला. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. दासगावमधील श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप दासगाव या संस्थेने आपली परंपरा जपण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
मागील अनेक वर्ष या परिसरातील भोई समाज आपला उदरनिर्वाह होडीतून मासेमारी आणि वाळू काढून करत आहेत. दासगाव हा खाडी परिसर असल्याने भरती ओहोटीचे ज्ञान आणि होडी चालवण्याचे कसब या परिसरातील भोई समाजातील ग्रामस्थांना चांगले आहे. यामुळे आपली परंपरा जपली जावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या स्पर्धेत दासगाव, महाड, दाभोळ, पेवे, पंदेरी, या गावातील तरुणांनी सहभाग घेतला होता. गावातील तरुण आणि महिला वर्गाने वैविध्यपूर्ण वेशभूषा करत या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यामुळे दासगाव बंदर परिसरात एकच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई आणि अन्य शहरात असलेल्या भोई समाजाच्या लोकांनी देखील स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. या स्पर्धा पाहण्याकरता किनाऱ्यावर महाड, दासगावकरांनी गर्दी केली होती. सात होड्यांचा एक गट याप्रमाणे रेल्वे पुलाजवळून होड्याना सूचना देताच स्पर्धेला सुरुवात झाली. समोरून सोसाट्याचा वारा असताना देखील हाताने होडी वल्हवत नेमून दिलेल्या लक्ष्यापर्यंत नेली जात होती. होड्या वल्हवत नेणे हा उपस्थित प्रेक्षकांसाठी एक रोमांचक क्षण अनुभवता आला. संस्थेच्या सर्व सदस्यांनी यावेळी अथक मेहनत घेतली.
सरपंच तपस्या जंगम यांनी देखील उपस्थित सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयेश मिंडे, परेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ, द्वितीय क्रमांक रुपेश पड्याळ, निखिल निवाते, दिपेश निवाते, तृतीय क्रमांक सूमेश जाधव, स्वप्नील जाधव, प्रणेश निवाते, चतुर्थ क्रमांक पांडुरंग मिंडे, गणेश मिंडे, शिशुपाल कर्जावकर तर उत्कृष्ट नाखवा जयेश मिंडे, रुपेश पड्याळ,सुमेश जाधव. आकर्षक होडी सजावट बाळकृष्ण मिंडे, अशोक मिंडे, परेश निवाते, पारंपरिक पेहराव रोहित मिंडे, ऋग्वेद पड्याळ, प्राप्ती पड्याळ यांनी पटकावले. संस्थेच्यावतीने या सर्वांचा सन्मान चिन्न देऊन सत्कार करण्यात आला.