By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: दोनच दिवसांपूर्वी किल्ले रायगडावरील चित्त दरवाजाजवळ दरड कोसळून झालेल्या अपघातात पर्यटकांच्या दोन वाहनांसह स्थानिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली होती. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुरातत्त्व विभागाने 15 जून पासून रायगडवर जाणारा पायरी मार्ग बंद केला आहे.

किल्ले रायगडवर जाणाऱ्या चित्त दरवाजाजवळ दोन दिवसापूर्वी दरड कोसळून झालेल्या अपघातात किल्ले रायगड (Raigad Fort) पाहण्यासाठी येणाऱ्या दोन पर्यटकांच्या वाहनांचे दरडीमुळे (land sliding) प्रचंड नुकसान झाले होते. त्याच प्रमाणे चित्त दरवाजा जवळील स्थानिक दुकानदारांचे देखील या दरडीच्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोकणात मान्सून सक्रिय झाला असून रायगड वर पडणारा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा असतो. या पावसामुळे रायगड किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळू नये यासाठी पुरातत्त्व विभागाने 15 जून पासून चित्त दरवाजा मार्गे जाणारा रस्ता बंद केला आहे.

रायगडावर जाणारा चित्त दरवाजा मार्गे रस्ता बंद केल्याची कल्पना पुरातत्त्व खात्याने जाहीररित्या प्रसिद्धी करून देणे आवश्यक आहे. तसे न केल्याने पायरी मार्गे जाणाऱ्या पर्यटकांना रोपवेच्या (rope way) खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

किल्ले रायगड वरील चित्त दरवाजा जवळील झालेली घटना ही आकस्मिक स्वरूपाची असली तरी रायगडावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता अधिक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दरड कोसळणाऱ्या भागात पुरातत्त्व विभागाने दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पुरातत्त्व खाते जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे स्थानिक जनतेने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here