Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या ५ वर्षात रक्तदानात वाढ झाली आहे. राज्यात २०१८ या वर्षात १६.५६ लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. तर २०२२ या वर्षात १९.२८ लाख युनिट्स रक्त संकलित करण्यात आले. याचाच अर्थ गेल्या पाच वर्षांत राज्यात रक्तसंकलनात १६ टक्के वाढ झाली असल्याचे समोर आले.
गेल्या पाच वर्षात ऐच्छिक रक्तदात्यांमध्ये कोणताही बदल झालेला नसून कोविड काळानंतरही रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, वर्षभरात एकूण रक्तदानापैकी ९९ टक्के स्वेच्छेने रक्तदान होत असते. तसेच रक्तपेढ्यांना नेहमीच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान मोहीम आयोजित करण्याचे निर्देश देतो. गेल्या वर्षीची मागणी लक्षात घेऊन १० ते १५ टक्के अतिरिक्त रक्त ठेवण्यास आम्ही सुचित करत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रक्तदान शिबिरांना चालना देण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यात २७ रक्तपेढ्यांना प्रत्येकी २५,००० रुपये देणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा भासल्यास त्यांना रक्तपेढ्यांकडून कॉल करता येणार आहे. तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने रक्तदाता दिन साजरा करण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यातून तरुण रक्तदात्यांवर भर दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.