साईड पट्टीच्या कामात निकृष्ट दर्जाचा दगड

डांबराचे प्रमाण अत्यल्प ?

By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांच्या अखत्यारीत सुरू असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्यापासून (चित्त दरवाजा) छत्री निजामपूरपर्यंतच्या रस्त्याचे साईड पट्टीचे काम करताना ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा दगड व अत्यल्प प्रमाणात डांबरचा वापर केल्याने शासनाचे एक कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. संबंधित निकृष्ट दर्जाचा डबर काढून उत्तम प्रतीचा दगड वापरल्याशिवाय या रस्त्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला अदा करू नये, अन्यथा 21 गावातील नागरिक उपोषणास बसणार असल्याचे 21 गाव संघर्ष समितीचे सचिव सुभाष मोरे यांनी सांगितले.

या रस्त्याच्या साईड पट्टीसाठी वापरण्यात येणारा दगड हा जलसंपदा विभागाच्या परडी येथील जलविद्युत बोगद्यातील काढलेला पंधरा वर्षांपूर्वीचा दगड या ठेकेदाराने या साईड पट्टीच्या कामासाठी वापरला आहे. याबाबत छत्री निजामपूरमधील व रायगड प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या 21 गाव संघर्ष समितीने या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या दगडाबाबत हरकत घेतली. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व शाखा अभियंता डोळ्यावर पट्टी बांधून ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

रायगड परिसरातील सर्वच कामे नित्कृष्ट दर्जाची झाली आहेत. साईड पट्टीसाठी बोझरने स्प्रे करून डांबर साईड पट्टीवर वापरणे बंधनकारक असताना ठेकेदाराने ड्रम मध्ये डांबर टाकून ती झारीने मारल्याने साईड पट्टीवर टाकलेल्या खडीला डांबर चिकटलेच नाही. अशी अवस्था असल्याने सुमारे एक कोटी रुपये राज्य शासनाचे पावसाळ्यापूर्वी पाण्यात गेले आहेत, असा दावा संघर्ष समितीने केला आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्यास अधिकारी वर्ग तयार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here