मेणबत्ती कारखान्याला लागलेल्या आगीत झाला मृत्यू 

Twitter: @maharashtracity

धुळे: वाढदिवसाच्या दिवशी वापरात येणारी शोभेची मेणबत्ती (sparkling candle) तयार करण्याच्या वर्कशॉप मध्ये आग लागून चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत निजामपूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भैय्या सुरेश भागवत (वय ३६ वर्षे ) रा. जैताणे (ता.साक्री) यांनी फिर्याद दिली आहे. रोहिणी जगन्नाथ कुवर, जगन्नाथ रघुनाथ कुवर व अरविंद जाधव सर्व रा. वासखेडी (ता.साक्री) तसेच सुरेश बापू माने रा. धोत्री ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद अशी संशयितांची नावे आहेत.

पैकी जगन्नाथ कुवर हा वर्कशॉपचा सुपरवायझर असून अरविंद जाधव हा कंपनीचा ऑपरेटर आहे.

दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता वासखेडी येथील भवानी सेलिब्रेशन वर्कशॉप येथे अचानक लागलेल्या आगीत आशाबाई भैय्या माळी, पुनम भैया माळी, नैनाबाई संजय माळी व सिंधुबाई धुडकू राजपूत सर्व रा. जैताणे (ता. साक्री) यांचा भाजल्याने मृत्यू झाला तर संगीता प्रमोद चव्हाण व निकिता सुरेश महाजन या दोन्ही जखमी झाल्या आहेत.

वर्कशॉप चालविणाऱ्या चौघा संशयितांनी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना न करता स्फोटक दारू वापरून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी वापरली जाणारी मेणबत्ती तयार करण्याच्या उद्योग चालविला होता. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडे शासनाचा परवानाही आढळला नाही. असे असतांना चौघांनीही या वर्कशॉपमध्ये बालमजुरांना कामावर ठेवले होते. याच वर्कशॉपला अचानक आग लागल्याने चौघींचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, असे या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here