अनुदान येताच पगार अदा करू, आयुक्त टेकाळे

Twitter: @maharashtracity

धुळे: थकित पगार न झाल्याने आज संजय अग्रवाल या धुळे महापालिकेतील कर्मचाऱ्याने अखेर आयुक्त यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल टाकून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून अग्रवाल यांना ताब्यात घेतले. अनुदान येताच आपला थकीत पगार अदा करू, असे आश्वासन आयुक्त देवीदास टेकाळे यांनी अग्रवाल यांनी दिले.

या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली.

अग्रवाल यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतल्याचे कळताच आयुक्त देवीदास टेकाळे यांनी अग्रवाल यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी लागलीच आपल्या दालनात बोलाविले. यावेळी महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी या उपस्थित होत्या.

अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार अक्षय तृतीया सारखा सण तोंडावर आलेला असताना कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार अदा झाला नाही. शासकीय अनुदान आलेले नाही. असे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची बोळवण केली आहे. दुसरीकडे  मार्च महिन्यामध्ये कर वसुली मोहीम राबवून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. या रकमेतून पगार अदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी व हनुमान जयंती असे उत्सव झालेत. आता अक्षय तृतीये सारखा सण तोंडावर आलेला असताना पगार होणे गरजेचे आहे.

१९ एप्रिल पर्यंत पगार न झाल्यास आपण कुठल्याही क्षणी आयुक्तांच्या दालनासमोर पेट्रोल अंगावर टाकून घेत आत्महत्या करू असा इशारा दिला होता. 

या पार्श्वभूमीवर पगार थकलेले सर्व २१ कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. यात नितीन जोशी, संदीप गवळी, प्रल्हाद जाधव, संगीता जांभळे, अनिल सुडके, राजेंद्र गवळी, जाकिर बागवान, बशीर मुर्तुजा, श्रीकांत चव्हाण, मनोज जोशी, गोपाळ साळुंखे, कैलास मासाळ, देविदास पाटील, योगेश मोगल, गोपाल जडे, बाळकृष्ण यादव, रघुनाथ विसपुते, अतुल चौधरी, सिताराम चौरे, जगदीश सोनजे व सुनील शिरसाठ यांचा समावेश होता.

माफी मागितली

“थकीत पगाराच्या मागणीसाठी आपण महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं केल्याची आपणास जाणीव झाली. यामुळे आपण आयुक्त आणि पोलीस प्रशासनाचीही माफी मागितली.”

–  संजय अग्रवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here