By Milind Mane
Twitter :@manemilind70
किल्ले रायगड: शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आज तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना हा सोहळा साजरा करण्यासाठी राज्यासह देश-विदेशातून आलेल्या लाखो शिवभक्तांमुळे महाड ते रायगड या 24 किलोमीटर अंतरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका शिवभक्तांना बसला. त्यामुळे अनेक शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळा न पाहताच माघारी परतावे लागल्याची घटना आज किल्ले रायगडवर घडली.
शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना या सोहळ्यासाठी आलेल्या लाखो शिवभक्तांमुळे किल्ले रायगडावर अनेक पर्यटकांना जाण्यापासून वंचित रहावे लागले. किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीकडून तसेच शासनाकडून येण्याचे शिवभक्तांना आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी देश-विदेशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त पाच तारखेपासूनच दाखल झाले होते. रायगडावर जाण्याचा एक मार्ग महाडपासून तर दुसरा मार्ग माणगावपासून असल्याने दोन्ही बाजूकडून येणारे शिवभक्त मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने व मोटरसायकलने येत असल्याने दोन्ही कडील बाजूवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण पडला.
ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी झालेली प्रचंड गर्दी पाहून व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रायगडकडे जाणारा रस्ता बंद केला. त्यातच महाडकडून जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने व एकेरी वाहतूक चालू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
महाड शहरापासून जवळच असलेल्या नातेखिंडीपासून वाहतूक कोंडी सोमवारी रात्रीपासूनच झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका किमान 50,000 शिवभक्तांना बसला असून त्यांना किल्ले रायगडावर न जाता माघारी फिरावे लागले. किल्ले रायगडवर तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जमलेली गर्दी अत्यल्प होती. त्यानंतर चार दिवसांनी येणाऱ्या तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अलोट गर्दी होणार याची कल्पना प्रशासनाला असताना देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यापासून वंचित रहावे लागले, याला सर्वश्री प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा नाते खिंडे इथून माघारी परत जाणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत होती.