Twitter: @maharashtracity
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या ’दोस्त मुंबई‘ या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना ’दोस्त दिंडी पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. २०२३ या वर्षीच्या या पुरस्कारासाठी डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिंगारे आणि डॉ. अरूणकुमार भगत यांची निवड झाली आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये ज्येष्ठ शल्यचिकित्सक व अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. वत्सला त्रिवेदी, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व प्रशासन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रवीण शिंगारे, तसेच पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती आणि अवयवदान क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. अरुणकुमार भगत यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १० जून रोजी नवी मुंबईतील कामोठे येथील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या अवयवदान दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या प्रस्थान व सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीएसटीचे उपायुक्त डॉ. विजय डांगे, मंत्रालयातील महसूल विभागाचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज तर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रस्थान सोहळा :
धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो- हेल्थ ट्रॉन्सफॉर्मेशन(दोस्त) या संस्थेचे संस्थापक आणि अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. कैलाश जवादे हे दरवर्षी आषाढी वारीत अवयवदान दिंडी घेऊन सहभागी होतात. या दिंडीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्यावर विविध उपचार,औषधे वाटप केले जाते. तसेच पथनाट्य, भारूड, लोकगीते या माध्यमातून सर्वसामान्यांच्या भाषेत अवयवदान याबद्दल जाणीव जागृती केली जाते. या दिंडीचा प्रस्थान सोहळा कामोठे सेक्टर १५ मधील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता रंगणार आहे. या वेळेस वारीत सामील विद्यार्थी पथनाट्ये, भारूड आणि नृत्य सादर करणार आहेत.