By Santosh More

Twitter: @santoshmore

मुंबई: सत्ता स्थापनेनंतर अखेर दहा महिन्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा मुहूर्त सापडला आहे. नेमकी तारीख अजून निश्चित झाली नसली तरी हा विस्तार अत्यंत छोटेखानी असेल आणि केवळ १० सदस्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार हा विस्तार 9 किंवा 10 जून रोजी होण्याची शक्यता आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या सहा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चार सदस्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल. शिंदे शिवसेनेतील असंख्य आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून प्रत्यकेच आमदार मंत्रिपदाचे सप्न बघत आहे. अशा वेळी उर्वरित ३० पैकी केवळ चार आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याने शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याधीच पक्षातील आमदार नेत्यांना त्यागाची तयारी ठेवा असे आवाहन करून मंत्रिमंडळात सर्वच इच्छुकांना स्थान मिळणार नाही, कदाचित ज्येष्ठ नेत्यांना डावलून नवीन आमदारांना संधी दिली जाऊ शकेल असे अप्रत्यक्ष सूचित केले होते. तसेच भाजपात फडणवीस यांच्या विरोधात बंड करून स्वतः चे राजकीय जीवन संपवण्याची हिम्मत आज तरी कोणात ही नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही तरी भाजपात विरोधाचा सूर उमटण्याची शक्यता जवळपास नाही. मात्र, शिंदे गटाची निर्मितीच बंडखोरीतून झाली असल्याने मंत्रिमंडळात ज्याची वर्णी लागणार नाही, त्याच्याकडून विरोधाचा सूर उमटू शकेल, असा दावा उद्धव ठाकरे गटातील नेत्याने Maharashtra.city शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, ऑक्टोबर मध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता सर्वच नेत्यांनी व्यक्त केली असल्याने मुंबईत कमकुवत असलेला शिंदे गट मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईतील एखाद्या आमदाराला संधी देऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतून यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, रायगडमधून भरत गोगावले, विदर्भातून शिवसेनेचे प्रवक्ते संजय गायकवाड यांना तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पूर्वीच्या राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात पूर्वी शपथ घेतलेल्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल देखील होण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने अब्दुल सत्तार यांच्या कडील कृषी खाते काढून घेऊन ते बच्चू कडू यांच्याकडे सोपवले जाईल असा दावा सूत्रांनी व्यक्त केला.

सध्या शिवसेनेचा मुंबई आणि विदर्भातील एकही मंत्री नाही. तर मराठवाड्यात शिवसेनेचे संदिपान भूमरे आणि अब्दुल सत्तार हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत. मराठवाड्यातून संजय शिरसाटही मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई आणि विदर्भाला संधी मिळणार का? याकडे शिवसेनेतील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 10 जणांनाच संधी मिळणार असल्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांपैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जम्बो स्वरूपाचा होणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हा विस्तार छोट्या स्वरूपात होणार असून भाजपकडून 6 तर शिंदे गटाकडून 4 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला 4 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद तर शिवसेनेला 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 9 कॅबिनेटमंत्री आहेत. आणखी 23 जणांना मंत्रिपदाची संधी आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 10 जणांचाच समावेश केला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उरलेल्या 13 मंत्रिपदासाठी या वर्षाअखेरीस विस्तार होण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इच्छुकांची नावे चर्चेत आहे. राम शिंदे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रवीण दरेकर, योगेश सागर, गणेश नाईक, विनय कोरे, जयकुमार गोरे तर महिलांमध्ये मनीषा चौधरी, मंदा म्हात्रे, देवयानी फरांदे आदी नावे चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here