राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप….!
By Anant Nalavade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.
महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्य सरकारचा जो दृष्टिकोन आहे, त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही खासदार सुळे यांनी मांडली.
गेल्या काही महिन्यांपासून राज्याचा अनेक भागात जातीय दंगलीच्या घटना घडत आहेत. मग ती नगरची घटना घडली आता कोल्हापूरमध्ये घटना घडली आहे. सारखेच तणावाचे वातावरण राज्यात कसे होते, असा सवाल करतानाच अशाच गोष्टी घडत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर यामुळे राज्याचे नुकसान होणार आहे अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शिवाय जनता ही घाबरलेली व बिथरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, असा आरोपही खासदार सुळे यांनी केला.
मात्र, मला गंमत आणि आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून सारखे वातावरण दुषित का होते आहे असा थेट सवालही त्यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
देशातून किती विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्या मुलींचे गार्हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोलाही खासदार सुळे यांनी भाजपला लगावला.