Twitter : @milindmane70

महाड

पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर वनक्षेत्रपाल राकेश साहू आणि त्यांचे पथक गस्त घालत असताना दोन ट्रॅक्टरमध्ये आंब्याचे भले मोठे लाकूड आणि साग वाहतूक करताना आढळले. याबाबत चौकशी केली असता वाहतूक करणाऱ्या लोकांकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे आढळली नाहीत. यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत वनाधिकारी राकेश साहू यांनी सांगितले की, ओंबळी गावाजवळ ही विना परवाना लाकूड वाहतूक आढळून आली. यामध्ये नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, एक जे.सी.बी., एक स्कूटर, तसेच आंब्याची दोन लाकडे, साग असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सूर्यकांत सुरेश तांबे (३८) मांडवे, दिनेश रामदास तांबे, (वय ४५), कोरेगाव, तालुका खेड, ट्रॅक्टर चालक अनिल धर्मा चव्हाण, सुकिवली, खेड, ट्रॅक्टर मालक संदीप श्रीकांत पाटणे, (४२) भरणे नाका, जे सी बी चालक रजनिश मनिराम निसाद, (२४) अकबरपुर यू पी, शेखर यशवंत शिंदे (३२), कोरेगाव खेड, कपिल देव, जेसीबी हेल्पर नीसाद यू पी सध्या मुक्काम पोलादपूर, अमेष जयराम तांबट (३०), कोरेगाव खेड, कामगार, बबन लक्ष्मण तांबे (४०) मांडवे यांचा समावेश आहे. 

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या विरोधात भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ कलम ४१, ४२ अन्वये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी राकेश साहू यांनी दिली. या पथकामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी राकेश साहू, वनपाल संजय चव्हाण, संदीप परदेशी वनरक्षक अतिरिक्त कार्यभार पोलादपूर, वन रक्षक कोतवाल पी. डी.जाधव वनरक्षक, यांचा समावेश होता.

महाड वन विभागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षांची तोड होत असल्याने जंगलातील वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा रहिवासी क्षेत्रांकडे वळविला आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीला महाड वन विभागाचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल वन प्रेमी नागरिक वनविभागाला विचारत आहे. मात्र सुस्त झोपी गेलेले वनखात्याचे अधिकारी याबाबत कोणतेही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना लगाम कोण घालणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. महाड वन विभागाकडून आजपर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या त्यावर कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे वारंवार बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरण उघडकीस येत आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर खैराच्या वृक्षांची तोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या सुमारास पिकप जीप मधून खैराच्या वृक्षांची वाहतूक महाड – पोलादपूरवरून खेडकडे होत असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र सुतराम कल्पना नसल्याने महाड तालुक्यातील खैराची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here