Twitter :@milindmane70

महाड

महाड एम.आय.डी.सी. मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सात जण गंभीर जखमी आहेत तर 11 जण दगावल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. ही आग आटोक्यात आणणे एमआयडीसीमधील अग्निशमण यंत्रणेच्या हाताबाहेरील असल्यामुळे राज्य शासनाने एनडीआरएफ ला पाचारण केले आहे. जखमी कामगारांना एम. एम. ए. सी. इ. टी. पी. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या कंपनीच्या बाहेर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाड शहर, महाड औद्योगिक वसाहत, पोलादपूर व आजूबाजूच्या ठिकाणावरून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे।

कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टर्सचा स्फोट झाला. यामुळे येथील आग पसरली आणि रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटांच्या दणक्याने कामगार जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या विरल, झुआरी, आणि अक्वाफार्म या कंपनीतील कामगारांनीदेखील कंपनीबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली, त्याच्या शेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने विरल कंपनीच्या कामगारांनी आग विझवण्यास सुरवात केली. या स्फोटात कंपनीच्या प्लांटचे अतोनात नुकसान झाले आहे. दहा वाजता लागलेली आग दुपारी बारा वाजले तरी आटोक्यात आणता आली नव्हती. 

ब्लू जेटमधील ज्या प्लांटला आग लागली, तो प्लांट पूर्णपणे स्फोटात जमीनदोस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर या कंपनीमध्ये इमारतीत असणारे लोखंडाचे खांब देखील वितळले आहेत. कंपनीचे पूर्ण स्ट्रक्चर जमीनदोस्त झाल्याने ढिगार्‍याखाली अकरा कामगार अडकून मृत पावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमण दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, कंपनीचे स्ट्रक्चर जमीनदोस्त झाल्याने व त्याखाली अडकलेल्या 11 कामगारांना काढणे अग्निशमण दलाला शक्य न झाल्याने अखेर राज्य सरकारकडे एनडीआरएफला पाचारण करण्यास सुचविण्यात आले

प्राथमिक माहितीनुसार ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत 18 कामगार काम करत होते. आग लागताच अनेक जणांनी जीव वाचवण्यासाठी कंपनीबाहेर पळ काढला.

ब्लू जेट कंपनीमधील जखमी कामगारांची नावे पुढीलप्रमाणे

(1) स्वप्निल भामरे, (2) विक्रम ढेरे, (3) निमाची मुरमु, (4) मयूर निंबाळकर, (5) राहुल गिरमे, (6) स्वप्निल भामरे, (7) उत्तम विश्वास, (8) ज्योतु पूरब

बेपत्ता असणाऱ्या परंतु प्राथमिक माहितीनुसार मृत असल्याचे व बेपत्ता असलेल्या कामगारांची नावे पुढील प्रमाणे;

जीवन कुमार चोबे, अभिमन्यू उंराव, विकास महातो, अक्षय सुतार, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार, असलम शेख, सतीश साळुंखे, आदित्य मोरे हे अकरा कामगार प्रथमदर्शनी गायब असून मृत झाले असल्याची धक्कादायक माहिती कंपनी बाहेर जमलेल्या मृतक कामगारांच्या नातेवाईकांमध्ये चर्चिली जात होती.

जखमी कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. यातील विक्रम डेरे हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचाराकरता स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली. गायब झालेल्या परंतु मृत असलेल्या कामगारांचे मृतदेह कंपनीतील रिऍक्टरच्या स्फोटामुळे पूर्णपणे वितळून गेले असून मृत कामगारांची ओळख पटवणे देखील प्रशासनाला अवघड होणार आहे.

महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर?

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या केमिकल कंपन्यांपैकी कोणत्यातरी एका कंपनीत दर पंधरा दिवसांनी आग लागणे, कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट होणे, यातून कामगार जखमी होणे किंवा कामगार मृत पावणे यासारख्या घटना महाड औद्योगिक वसाहतीमध्ये नित्य नियमाच्या झाल्या आहेत का? असा सवाल अनेक कंपन्यातील कामगार राज्य सरकारला विचारीत आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांमधल्या बॉयलर व रिऍक्टरची तपासणी करण्यासाठी येणारे सुरक्षा अधिकारी महाडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करतात, त्या ठिकाणीच बसून कागदी रिपोर्ट बनवून “पाकिटे” घेऊन निघून जात असल्याने कंपनीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे आज घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here